अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेक वर्ष ती वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटी हे एक लोकप्रिय माध्यम म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. अनेक लोकप्रिय मराठी कलाकार ओटीटीवर पदार्पण करत असतानाच सोनालीने मात्र अजून या माध्यमात काम केलेलं नाही. याचं कारण आता तिने स्पष्ट केलं आहे.
सोनाली आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकली. तर नटरंग या चित्रपटाने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे ती आता कोणत्या नवीन कलाकृतीमध्ये दिसणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. चित्रपटांमध्ये नाव मिळवल्यानंतर ती वेब सिरीजमध्ये कधी काम करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तर आता याबाबत तिने भाष्य केलं आहे.
त्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “वेब सिरीजमध्ये जर एखादी चांगली भूमिका मिळाली तर मी ती नक्कीच करेन. मी माझ्या कुटुंबीयांबरोबर बसून जे पाहू शकेन अशा कलाकृतीत काम करायचं असं मी आधीपासूनच ठरवलं आहे आणि हे तत्त्व मी करिअरच्या सुरुवातीपासूनच पाळलं आहे. आजपर्यंत मला चांगल्या भूमिका मिळत आल्या. इथून पुढेही वेगळं काम करण्यावरच माझा भर असेल.” तर आता सोनालीचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.