राज्यभरात गेल्या जवळपास एका महिन्यापासून पाऊस नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले होते. अशातच आज राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. आज जन्माष्टमीदेखील आहे. यानिमित्ताने जन्माष्टमी व पावसाचा संबंध जोडणारी एक पोस्ट अभिनेत्री स्पृहा जोशीने शेअर केली आहे.
“दर गोकुळाष्टमीला तू बरोब्बर पाऊस घेऊन कसा येतोस?
की पाऊस होऊन येतोस?
सगळं विज्ञान, भूगोल, लॉजिक आहेच
पण आजच्या दिवशी तुला त्यात बांधावसं नाही वाटत!
उगाचच आज तुझ्याशी भांडावंसं नाही वाटत!
तसंही बांधाल तितकं बंधन तोडून लांब जाण्याचंच खूळ तुला ..
मग तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी कशाला देतोयस आमच्या इंटेलेक्चुअल बुद्धीला?
त्यापेक्षा तुझं विश्वरूप दर्शन.. ते पेरलं असतंस आमच्या डोळ्यात…
तुझा सारासारविचार टोचला असतास आमच्या बुद्धीला…
आपल्या माणसांना काठावर ठेवण्याची शक्ती दिली असतीस..
किमान तुझी गूढ निळाईची एखाद रंगछटा दिली असतीस..
असो जिथे आहेस तिथे खुशाल अस!
इथली फार काळजी करू नको..
दर गोकुळाष्टमीला असा पाऊस पाठवत रहा फक्त
बाकी आमचं काही फार मनावर घेऊ नको..” अशी कविता स्पृहाने शेअर केली आहे.
दरम्यान, तिच्या या कवितेचं चाहते कौतुक करत आहेत. अनेकांनी अप्रतिम लिहिलंय, असं म्हणत स्पृहाचं कौतुक केलंय. तर अनेकांनी पाऊस आल्याने आनंद व्यक्त केला आहे.