सर्वांचे लाडके भावोजी म्हणजेच अभिनेते, सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे अभिनय क्षेत्राइतकेच राजकारणातही सक्रिय असतात. ते शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सदस्य आणि सचिव आहेत. अनेकदा ते त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. तर आता त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी आदेश बांदेकर यांच्या राजकीय कार्याविषयी भाष्य केलं आहे.
सुचित्रा बांदेकर गेली अनेक वर्षं वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर आता त्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यग्र होती. त्या दरम्यान ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांची राजकीय मतं मांडली.
“शिवसेनेत जेव्हा दोन गट पडले तेव्हा घरी तुमची त्याबद्दल काही चर्चा व्हायची का?” असं सुचित्रा बांदेकर यांना विचारलं गेल्यावर त्या म्हणाल्या, “आम्ही सुरुवातीपासून घरात राजकारण आणलंच नाही. आदेश खूप मनापासून त्या सर्व गोष्टी करतो. त्यातून त्याला एका पैशाचाही स्वार्थ नाही आणि सुरुवातीपासूनच त्यातून आमची कोणत्याही फायद्याची अपेक्षा नाही. त्यामुळे घरात तो विषय होत नाही. पण जी बाजू खरी आहे त्या बाजूलाच आदेश नेहमी उभा राहिला आहे. त्यामुळे आम्ही उद्धव साहेबांबरोबरच आहोत आणि त्यांच्या बरोबरच राहणार आहोत. कारण आम्हाला त्यांची बाजू पटते.”
दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांच्याबरोबरच रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे.