‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या तुफान गाजत आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने ३७ हून अधिक कोटींची कमाई केली. आता अभिनेत्री सुरुची अडारकर हिने या चित्रपटात काम करण्यासाठीचा अनुभव कसा होता हे सांगितलं आहे.

हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. याचबरोबर अभिनेत्री सुरुची अडारकर हिने या चित्रपटामध्ये वंदना गुप्ते यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा शूटिंगचा अनुभव तिने शेअर केला आहे.

हेही वाचा : अंकुश चौधरीच्या पत्नीचा ‘बाईपण भारी देवा’तील लूक आहे खूप खास, हातातल्या ब्रेसलेटमागे दडलाय मोठा अर्थ, घ्या जाणून

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुरुची म्हणाली, “बाईपण भारी देवा या चित्रपटामध्ये जी गोष्ट दाखवली आहे ती आपल्या आजूबाजूला कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात घडत असते. त्यामुळे आम्हाला ती करताना खूप मजा आली. या चित्रपटाचा मला भाग होता आलं हे माझं भाग्य आहे. या सगळ्या सहा अभिनेत्रींमध्ये एक वेगळीच एनर्जी आहे आणि त्या सगळ्याजणी सेटवर येताना ती एनर्जी त्यांच्याबरोबर घेऊन येतात. सेटवरून घरी जातानाही त्यांच्यात तेवढीच एनर्जी असते.”

पुढे ती म्हणाली, “सेटवर मला सगळ्याजणी गरीब गाय म्हणायच्या. त्यांच्याबरोबर असताना मी सेटवर त्यांच्या मानाने खूप शांत असायचे. मी फक्त त्यांचं निरीक्षण करायचे आणि निरीक्षणामधून आपल्याला खूप काही शिकता येतं. माझे जास्त सीन वंदना गुप्ते यांच्याबरोबर होते आणि त्या रोज स्क्रिप्टचा खूप कमालीचा अभ्यास करून सेटवर यायच्या. त्यांची स्क्रिप पाहिली तर त्यांच्या स्क्रिप्टवर प्रत्येक पानावर त्यांनी खुणा करून कोणत्या सीनमध्ये काय आहे हे लिहून ठेवलेलं असायचं आणि हे खरोखर शिकण्यासारखं आहे.”

आणखी वाचा : “कुठल्याही नव्या मराठी सिनेमाने…”, ‘बाईपण’ भारी देवा’ने ‘वेड’चा विक्रम, अंकुश चौधरीच्या पत्नीची प्रतिक्रिया चर्चेत

शेवटी ती म्हणाली, “या सहा जणांमध्ये केदार शिंदे टार्गेट व्हायचे असं जे म्हटलं जात होतं ते खरं आहे. कारण एकीला सांभाळणं हे कठीण आहे आणि त्यात सहा जणींना एकत्र सांभाळणं हे खूप कठीण आहे. ते कोणालाच जमू शकत नाही. कारण प्रत्येकीचे वेगळे विचार, वेगळे एनर्जी आणि त्या सगळ्याला एकत्र आणून एक कलाकृती तयार करणं खूप कठीण आहे. त्यामुळे माझ्या या बोलण्यावरून केदार सरांचं काय झालं असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता.”