मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर अनेकदा ती सामाजिक आणि राजकीय विषयांवर बिंदास्तपणे आपली भूमिका मांडताना दिसते. दरम्यान मराठी चित्रपट का चालत नाहीत? यावर तेजस्विनी पंडितने उघडपणे भाष्य केलं आहे.
तेजस्विनी म्हणाली, “कॅट फाईट फक्त अभिनेत्रींमध्येच बघितली जाते. निर्मात्यांमध्ये अशा प्रकारची कॅट फाईट मी बघितली नाही. मला असं वाटतयं एक इंडस्ट्री म्हणून आपण काम नाही करत आहोत. याचा कोणालाच फायदा होत नाहीये. आपल्याकडे सगळ्यांनी एकत्र येणं गरजेच आहे. आपल्याकडे मुळात चांगल्या विचाराने मोठे चित्रपट बनवणं गरजेचं आहे.”
तेजस्विनी पुढे म्हणाली, इंडस्ट्रीवाले म्हणतात आमच्याकडे प्रेक्षक येत नाहीत. प्रेक्षक म्हणतात, आम्हाला तुम्ही चांगले चित्रपट देत नाहीत. या दोन्ही गोष्टी एकत्र बॅलन्स होण्याची गरज आहे. त्यासाठी व्यावसायिक चित्रपट करणे गरजेच आहे. अनेक जण म्हणतात, इंडस्ट्रीमध्ये गटबाजी चालते. पण, मला ती गटबाजीपेक्षा तो कंफर्ट लेव्हल जास्त वाटतो. एखादा दिग्दर्शक जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला किंवा अभिनेत्याला वारंवार चित्रपटात घेत असेल तर तो त्याचा कंफर्ट लेव्हल असतो.”
तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत तिने अनेक मराठी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘तू ही रे’, ‘येरे येरे पैसा’, ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटांतील तिच्या भूमिकेचं सगळीकडे कौतुक झालं. आता लवकरच तिचा ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रसाद खांडेकर करत आहेत. अभिनयाबरोबर नुकतचं तेजस्विनीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.