ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून अनेक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी आतापर्यंत घेऊन आल्या आहेत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात रहात असतात. तर आता पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरून सांगितलं.
वंदना गुप्ते यांच्या लग्नाचा नुकताच ५०वा वाढदिवस संपन्न झाला. ५० वर्षांपूर्वी त्या शिरीष गुप्ते यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. तर नुकताच त्यांच्या लग्नाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा छोटेखानी विवाह सोहळा संपन्न झाला. कुटुंबीयांच्या साक्षीने वंदना गुप्ते व शिरीष गुप्ते यांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली.
आणखी वाचा : दोन दिवसांत पिंपल घालवायचेत? सुकन्या मोनेंनी सांगितला सोपा घरगुती उपाय, म्हणाल्या…
या दरम्यानचे काही क्षण त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ही खास पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं, “आमच्या लग्नासाठी माझी वहिनी अमेरिकेहून आली, माझी भाची कॅनडाहून आली, माझी लेक स्वप्ना वेस्टइंडिजवरून आली. या खास दिवशी हे सगळे आमच्या आनंदात सहभागी झाले. त्यांनी घरीच लग्नाची तयारी केली जेणेकरून आम्ही दोघांना ते अविस्मरणीय क्षण पुन्हा अनुभवायला मिळाले. सर्वाधिक आनंद याचा होता की आमची मुलं आमच्या लग्नाला हजर होती. आमच्या आनंदात सहभागी होऊन आमचा हा दिवस खास बनवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार.”
आता त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आली असून यावर कमेंट्स करत नेटकरी त्यांच्या लग्नाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.