आपल्या सुमधुर आवाजाने अनेक गायक, गायिका यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. असाच एका आवाज म्हणेज अनुराधा पौडवाल यांचा, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवरत्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आपल्या यशस्वी कारकिर्दीत असंख्य गाजलेल्या मराठी चित्रपटांच्या गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. कुलस्वामिनी’ चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १८ वर्षानंतर अनुराधा पौडवाल यांनी गाणे गायले आहे.
या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी ‘जय देवी, जय देवी, जय महालक्ष्मी’ ही आरती गाण्याच्या स्वरूपात गायली आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी अर्थात देवीमातेच्या तमाम भक्तांसाठी गाण्याच्या स्वरुपातली ही आरती म्हणजे अनोखी पर्वणी म्हणावी लागेल, याआधी अनुराधा पौडवाल यांनी अनेक भक्तिगीते गायली आहेत.
अनुराधा पौडवाल यांनी १९७३ साली प्रदर्शित झालेल्या अभिमान या हिंदी चित्रपटातून आपल्या गायनाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. प्रख्यात संगीत दिग्दर्शक एस. डी. बर्मन यांनी चित्रपटाला संगीत दिले होते.भक्तिगीतापासून ते धक धकसारखे गाणे त्यांनी गायले आहे. आत्तापर्यंत अनुराधा पौडवाल यांनी मराठी आणि हिंदीसोबत तमिळ, ओडिया, नेपाळी, बंगाली आणि कानडी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
‘कुलस्वामिनी’ या चित्रपटातील हे गाणं आज लाँच करण्यात आलं आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात ११ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते कंपनीचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल आहेत. या गाण्याचे संगीतकार अभिजीत जोशी असून लघुपट, चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील चित्रपटांचा अनुभव गाठीशी असलेले जोगेश्वर ढोबळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.