आजही मराठीत कॉमेडी चित्रपटांच्या यादीत ‘जत्रा’ चित्रपटाचं नाव हमखास घेतलं जातंच. २००६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. केदार शिंदे दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण आणि क्रांती रेडकर यांच्या यामध्ये महत्वाच्या भूमिका होत्या. साताऱ्यामधील एका गावामध्ये ‘जत्रा’चं चित्रीकरण करण्यात आलं.

केदार शिंदेयांनी आता एक व्हिडीओ शेअर करत ‘जत्रा’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जत्राच्या चित्रीकरणादरम्यान गाव कसं होतं आणि तिथे आता काय काय बदल घडले आहेत असा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आता केदार शिंदे यांच्या पाठोपाठ अभिनेता सिद्धार्थ जाधवनेदेखील या चित्रपटाशी निगडीत त्याची आठवण आणि काही मनातल्या गोष्टी शेअर केल्या आहे.

आणखी वाचा : ‘स्त्री २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार; ‘भेडिया’ आणि ‘रूही’ यांचीदेखील होणार एंट्री?

या चित्रपटातील त्याचे आणि भरत जाधवचे एक दृश्यं त्याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलं आहे. पोस्टमध्ये सिद्धार्थ लिहितो,

“१७ वर्ष जत्राची.. #आपलासिध्दू, एवढी वर्ष मायबाप रसिक ‘जत्रा’ वर प्रेम करतायत. या सिनेमात काम मिळण्यापासून ते माझ्या कामाचं कौतुक होण्यापर्यंत.. सगळं श्रेय जातं केदार शिंदे सरांना… आणि भरत जाधव सर… काम करताना सहकलाकराचा आत्मविश्वास कसा वाढवायचा हे भरत सरांकडून शिकावं… उत्तम कलाकार, कमाल सहकलाकार आणि सर्वोत्तम माणूस.. संपूर्ण टिम जत्रा… गण्या,कुशा,रम्या,संजा..लव्ह यू. विजू मामा तुम्हाला खूप मिस करतोय. #jatra”

सिद्धार्थच्या या पोस्टवर त्याचे चाहतेही कॉमेंट करत आहेत. तेसुद्धा कॉमेंट करून जत्रामधील काही आठवणींना उजाळा देत आहेत. केदार शिंदे आता त्यांच्या आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत आणि सिद्धार्थ जाधवही रणवीर सिंगच्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ या चित्रपटात झळकणार आहे.

Story img Loader