मराठी चित्रपटसृष्टीत अजय- अतुल ही नावं फार लोकप्रिय आहे. अजय- अतुल यांच्या गाण्याशिवाय मराठी चित्रपट फार क्वचित पाहायला मिळतात. सध्या हे दोघं ‘वेड’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा मराठी चित्रपट ‘वेड’ला अजय- अतुल यांनी संगीत दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी या चित्रपटाच्या गाण्यासाठी एका नवोदित कलाकाराला संधी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या कार्यक्रमात अजय- अतुल यांनी या चित्रपटाच्या गाण्यांबद्दल भाष्य केलं. यावेळी जितेंद्र जोशीने अजय- अतुल यांचं एका नवोदित कलाकाराला या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिल्याबद्दल विशेष कौतुक केलं. तसेच या मागचा एक किस्सा त्याने शेअर केला.
आणखी वाचा-“आम्ही ओरिजनल…” गाणी रिमिक्स करणाऱ्यांना अजय गोगावलेने दिली सक्त ताकीद
जितेंद्र जोशी म्हणाला, “काही दिवसांपूर्वीच एक मुलगा ‘चंद्रा’ हे गाणं गात असलेला व्हिडीओ मला कोणीतरी पाठवला होता. त्या मुलाचं गाणं ऐकून मी खरंच अवाक् झालो. मी तो व्हिडीओ अजय- अतुल यांना पाठवला होता. काय भारी गाणं गातोय हा मुलगा असं मी त्यांना म्हटलं होतं आणि धन्यवाद या दोघांचे की यांनी त्या मुलाला बोलवलं. त्याच्याकडून गाणं रेकॉर्ड करून घेतलं. जेव्हा मी वेडची गाणी ऐकल्यावर अजयला फोन केला त्यावेळी त्याने मला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली.”
जितेंद्र जोशी पुढे म्हणाला, “अजयने मला सांगितलं की त्या दोघांनी असा निर्णय घेतलाय की प्रत्येक मराठी चित्रपटामध्ये एकतरी नवीन माणसाला संधी द्यायची. जो आजवर कोणाला माहीत नाही. मग तो संगीतकर असेल, गायक असेल किंवा गीतकार असेल. या चित्रपटातील सर्वच गाणी अप्रतिम आहेत.” दरम्यान ‘वेड’ चित्रपट येत्या ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने स्वतः केलं आहे.