‘द केरला स्टोरी’च्या घवघवीत यशानंतर अभिनेत्री अदा शर्माचा ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ नुकताच प्रदर्शित झाला. परंतु, या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितका चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. १५ मार्च रोजी ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ बरोबरच सिद्धार्थ मल्होत्राचा ‘योद्धा’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी सिनेमागृह आणि स्क्रीन्स उपलब्ध नसल्याचंही अदाने एका व्हिडीओत सांगितलं होतं. आता या चित्रपटाबद्दल मराठमोळे अभिनेते अजय पुरकर यांनी भाष्य केलं आहे.
अजय पुरकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात प्रेक्षकांनी हा सिनेमा नक्की बघावा यासाठी त्यांनी आवाहन केलय. या व्हिडीओत अजय पुरकर म्हणाले, “काल ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ नावाचा एक झंझावात बघितला. काल सिटी प्राई़ड कोथरूडला पुण्यामध्ये त्याचा प्रीमिअर होता. तिथे चित्रपटातील खलनायक विजय कृष्ण यांच्याशी माझी ओळख झाली. या चित्रपटात इंदिरा तिवारीने खूप चांगलं काम केलंय. ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे. अदा शर्माने नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय केला आहे. सुदीप्तो सैन, अमरनाथ झा, विपुल शाह तुमचे खूप खूप अभिनंदन. ‘द केरला स्टोरी’नंतर आता हा एक धमाका आणलेला आहे.”
“प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट बघा आणि तुमच्याबरोबर तुमच्या मुलांनादेखील दाखवा. देशाला जी कीड आणि वाळवी लागलेली आहे, जी लोकं देश पोखरत आहेत, त्या सगळ्यांना या चित्रपटाने नागडं केलेलं आहे. शाळेत, कॉलेजेसमध्ये आपण जिथे काम करतो, तिथे आपल्या इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक लोकं आपल्या आजूबाजूला आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. तुमच्या मुलांना सावध राहायला सांगा, नाहीतर ही लोकं आपला देश संपवतील. ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ने अशा लोकांच्या सणसणीत कानाखाली मारलेलं आहे. हा चित्रपट प्रत्येक भारतीयांनी आवर्जून बघा, जय हिंद” असं आवाहन अजय पुरकर यांनी केलं आहे.
हेही वाचा… “विसरु नका तुमची आई…”, युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ट्रोलर्सवर संतापली, नेमकं काय घडलं?
दरम्यान, अजय पुरकर यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास, त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. २८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘स्कंद’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार राम पोथिनेनीबरोबर मराठमोळी सई मांजरेकर प्रमुख भूमिकेत झळकली आहे.