काही वर्षांपूर्वी ‘पावनखिंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला. या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर बांधलं. हे घर बांधण्याचा त्यांच्या मनात विचार कुठून आला याचा खुलासा आता त्यांनी केला आहे.
अजय पुरकर यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या या नवीन घराची झलक सर्वांना दाखवली. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या नव्या घराला ‘आई-बाबांचं घर’ असं नाव दिलं आहे. त्यांचं हे नवीन घर सर्वांना खूप आवडलं. सोशल मीडियावरून त्याबद्दल त्यांचं खूप कौतुकही झालं. तर आता हे घर त्यांनी का बांधलं याचं उत्तर त्यांनी दिलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “मी पं. विजय सरदेशमुख यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकलो. संजीव ताटके म्हणून त्यांचे वर्गमित्र आहेत. अनेक मैफिलींमधून मी गुरुजींना तानपुऱ्यावर साथ करायचो तेव्हा माझी अनेकांशी ओळख झाली आणि त्यापैकीच एक संजीव ताटके आहेत. काही वर्षांपूर्वीच ते मला म्हणाले होते की आंबा घाटात माझी एक जागा आहे ती मला तुला दाखवायची आहे. साधारण पंधरा वर्षांपूर्वी मी या जागेत राहूनही गेलो होतो. मग तेव्हा माझ्या डोक्यात इथे जागा घेण्याचा काहीच विचार नव्हता.”
हेही वाचा : प्राजक्ता माळीने खरेदी केलं नवीन घर, ‘असं’ आहे तिचं ड्रीम होम
पुढे ते म्हणाले, “पण नंतर योग येणं आपण म्हणतो तसं झालं. ‘पावनखिंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. गेली अनेक वर्षं संजीव ‘माझी अशी खूप इच्छा आहे की तू या ठिकाणी घर घ्यावंस किंवा बांधवंस’, असं म्हणत माझ्या मागे लागला होता. मग मी त्याचं बोलणं गांभीर्याने घेतलं. त्यासाठी पावनखिंडचं यश हा एक योग आला आणि मी इथे घर बांधलं.”