अजिंक्य देव यांना मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखलं जातं. ‘माहेरची साडी’ चित्रपटामुळे ते घराघरांत लोकप्रिय झाले. सिनेसृष्टीत आजही त्यांची लोकप्रियता कायम आहे. अजिंक्य यांना त्यांचे आई-वडील दिवंगत अभिनेते रमेश देव व सीमा देव यांच्याकडून अभिनयाचा वारसा लाभला. पुढे आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मराठीसह अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सध्या ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी मराठी चित्रपटांसंदर्भात नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ स्वरुपात एक पोस्ट शेअर केली आहे यात ते म्हणतात, “मी अनेकदा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये रील व्हिडीओ बनवतो याचा अनेकांना त्रास होतो. त्यांना वाटतं मी माझी मायबोली विसरून या गोष्टी करतो. मला या सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे, ही सगळी मंडळी मराठी चित्रपटाचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ लागला की जातात का? हे लोक मराठी चित्रपट पाहायला जात असतील तर या मंडळींनी नक्की मला तसं सांगावं म्हणजे मी त्यांना सलाम ठोकेन.”
हेही वाचा : “जे खूप घातक आहे”, ‘अॅनिमल’ चित्रपटासंदर्भात वैभव मांगलेंची पोस्ट; म्हणाले, “हिंसा आणि लैंगिकता…”
अजिंक्य देव पुढे म्हणाले, “मराठी चित्रपटसृष्टीतील सगळेच चित्रपट चालत नाही. पण, हिंदीमध्ये असं होताना दिसत नाही. त्यांचे बहुतांश चित्रपट चालतात. ही सगळी विरोध करणारी मंडळी मोठ्या स्टार्सचे हिंदी चित्रपट १०१ टक्के पाचशे ते हजार रुपयांचं तिकीट काढून पाहायला जातात. म्हणूनच सध्याचे हिंदी चित्रपट एवढी कमाई करत आहेत.”
हेही वाचा : “त्या दोघांचा प्रवास…”, अमृता देशमुख-प्रसाद जवादेची लग्नपत्रिका पाहिलीत का? पत्रिकेमधील कवितेने वेधलं लक्ष
“मी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतो हे मान्य करतो. यापुढे मी माझ्या मायबोलीत संवाद साधण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण, त्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आम्ही मराठी चित्रपट पाहणार आणि आपल्या चित्रपटांना हिंदीच्या तोडीस तोड पहिल्या दिवशी जाऊन गर्दी करणार हे सांगा. मग मी नक्कीच या अशा लोकांना सलाम ठोकेन.” असं अजिंक्य देव यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं. दरम्यान, अजिंक्य देव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर सध्या नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.