‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका चांगलीच गाजली होती. अभिनेता अजिंक्य राऊत व अभिनेत्री हृता दुर्गुळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत अजिंक्यने साकारलेला इंद्रा व हृताने साकारलेली दीपिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. या इंद्रा-दीपूच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्यामुळे मालिका संपल्यानंतर पुन्हा एकदा इंद्रा-दीपू प्रेक्षकांच्या कधी भेटीस येणार? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर तो दिवस आला. लवकरच इंद्रा-दीपू प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
अभिनेता अजिंक्य राऊत व अभिनेत्री हृता दुर्गुळे आता मालिका नव्हे तर चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला. अजिंक्य व हृताने या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अजिंक्य राऊत व हृता दुर्गुळे यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘कन्नी’ असं आहे. या चित्रपटात हृता, अजिंक्यबरोबर अभिनेता शुभंकर तावडे, ऋषी मनोहर, वल्लरी विराज पाहायला मिळणार आहे. मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची ‘कन्नी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मल्हार पिक्चर कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमेजीनेशन फिल्मस प्रोडक्शन निर्मित ‘कन्नी’ चित्रपटाचं दिग्दर्शन समीर जोशी यांनी केलं आहे. या चित्रपटाचं पोस्टर पाहून हृता, अजिंक्यच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.