सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर अशी ओळख घेऊन ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात येत सूरज चव्हाण(Suraj Chavan)ने स्वत:ची नवीन ओळख निर्माण केली. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत त्याने बिग बॉस मराठी ५ ची ट्रॉफी जिंकली. बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी सूरजची भेट घेतली होती. तसेच त्याला घर बांधून द्या, अशी सूचना दिल्या होत्या. घराचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर सूरजने अजित पवार यांचे आभार मानले होते. दादांनी गरिबाच्या पोराला मदत केली, घराचं स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असे सूरज म्हणाला होता. आता अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी केली आहे. यासंबंधी एक्सवरील त्यांच्या अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
“कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे”
अजित पवार यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये लिहिले, “बिग बॉस मराठीचा विजेता, बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाणच्या नवीन घराच्या चालू बांधकामाची पाहणी केली. कामात कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, अशा सूचना संबंधितांना दिल्या.” या पोस्टमध्ये काही फोटोदेखील पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये अजित पवार घराच्या बांधकामाची पाहणी करताना दिसत आहेत. तसेच काही फोटोंमध्ये ते उपस्थितांशी संवाद साधत असल्याचे दिसत आहे.
सूरज चव्हाणने अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवार यांचे आभार मानल्याचे याआधी पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपासून तो त्याच्या चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहेत. सूरजचा झापूक झुपूक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात सूरज चव्हाण एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
बिग बॉस मराठीचा विजेता, बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाणच्या नवीन घराच्या चालू बांधकामाची पाहणी केली. कामात कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, अशा सूचना संबंधितांना दिल्या.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 13, 2025
?बारामती pic.twitter.com/GlFDQoqBCj
निरागस आणि रौद्र अशा दोन्ही रूपांत तो चित्रपटात दिसणार असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखनेदेखील हजेरी लावली होती. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात सूरज चव्हाणसह पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, जुई भागवत हे कलाकारदेखील मुख्य भूमिकांत दिसत आहेत. २५ एप्रिल २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता बिग बॉस मराठी ५ मध्ये जसे सूरजला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले, त्याप्रमाणेच त्याच्या या नवीन चित्रपटाला प्रतिसाद मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.