छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळादिनानिमित्त काही मराठी चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचाही समावेश आहे. यामध्ये तुम्हा सर्वांचा लाडका परश्या म्हणजेच आकाश ठोसर छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय.
आकाश ठोसरने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये तो तरुण छत्रपती शिवरायांच्या लूकमध्ये दिसत आहे.आकाश ठोसर या चित्रपटात ‘बाल शिवाजी’ ही भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये त्याचा शिवाजी महाराजांसारखा लूक पाहायला मिळतोय. हातात तलवार, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात कवड्यांची माळ अन् भेदक नजर पाहायला मिळत आहे.
“लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो.”
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळादिनानिमित्त सादर आहे,
स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर” असं कॅप्शन देत आकाशने हे पोस्टर शेअर केलं आहे.
आकाशच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच मराठी इंडस्ट्रीतील रवी जाधव, अक्षय वाघमारे, शिव ठाकरे यांनी कमेंट्स करत आकाशला नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.