मराठीसह बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा दमदार अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला ओळखलं जातं. आजवर त्याने प्रत्येक माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या श्रेयसला डिसेंबर २०२३ मध्ये वैयक्तिक आयुष्यात एका कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला होता. १५ डिसेंबर २०२३ रोजी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला. ही बातमी समोर आल्यावर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अशा कठीण प्रसंगात अभिनेत्याची बायको दीप्ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. या काळात तिला श्रेयसच्या मित्रमंडळींसह काही बॉलीवूड सुपरस्टार्सनी मदत केली नुकत्याच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत दीप्ती तळपदेने खुलासा केला आहे.
श्रेयसची प्रकृती बिघडल्यावर दीप्तीने प्रसंगावधान दाखवून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केला. यावेळी तिला ड्रायव्हर, रुग्णालयाचा संपूर्ण स्टाफ व रस्त्यावरच्या काही सामान्य मुंबईकर नागरिकांनी मदत केली. श्रेयसला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर दीप्तीने पहिला फोन अभिनेत्याच्या चुलतभावाला केला होता. यानंतरचा घटनाक्रम सांगताना दीप्ती म्हणाली, “मला त्या काळात प्रत्येकाने मदत केली. मी माझ्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही.”
दीप्ती पुढे म्हणाली, “श्रेयसच्या आजारपणाची बातमी सर्वत्र प्रसारित झाल्यावर त्याचे दिग्दर्शक अहमद खान व त्यांची पत्नी हे दोघेही रात्री ११ वाजता रुग्णालयात आले होते. माझ्याबरोबर ते दोघेही खूप वेळ थांबले होते. सध्या शूटिंग चालू असलेल्या चित्रपटात त्याच्याबरोबर अक्षय कुमार काम करतोय…अक्षय मला रात्रभर फोन करून श्रेयसची चौकशी करत होता.”
हेही वाचा : सद्य राजकीय स्थितीवर ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशेंनी मांडलं परखड मत; म्हणाले, “सगळ्याच नेत्यांकडून…
“अक्षयने मला एक-दोनवेळा दीप्ती आपण त्याला दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करूया का? तू सांगशील तिथे आपण व्यवस्था करूया असं सांगितलं. पुन्हा सकाळी त्याने मला फोन केला. मला फक्त दोन मिनिटं त्याला बघू दे. मी त्याला मग बोलावून घेतलं. मराठी असो किंवा हिंदी दोन्ही कलाविश्वातील कलाकारांनी आम्हाला या काळात खूप मदत केली. सगळेजण आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले” असं दीप्तीने सांगितलं.