अभिनेता अक्षय कुमारची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चर्चांचे मुख्य कारण म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित त्याचा आगामी मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात.’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साकारणार आहे. आज त्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यानिमित्त त्याने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हे समोर आल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. महेश मांजरेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षयची केलेली निवड अनेकांना अजिबात आवडलेली नव्हती. त्यामुळे नेटकऱ्यांनी महेश मांजरेकर आणि अक्षयला भरपूर ट्रोल केलं होतं. पण आता अखेर अक्षयने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
अक्षयने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोत तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नमस्कार करताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना त्याने लिहीलं, “आज मी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करत आहे. या चित्रपटात मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सकारणार आहे. ही भूमिका माझ्या वाट्याला येणं हे माझं भाग्य आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आणि आई जिजाऊंच्या आशीर्वादाने मी ही भूमिका साकारण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांचेही आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहुदेत.”
हेही वाचा : अक्षय कुमार ‘ओह माय गॉड २’मधून देणार लैंगिक शिक्षणाचे धडे, म्हणाला…
‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे, तर संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि तुझ्यात जीव रंगला अभिनेता हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहे.