‘माहेरची साडी’, ‘लेक चालली सासरला’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘आई माझी काळूबाई’, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत अलका कुबल(Alka Kubal) यांनी काम केले आहे. त्यांच्या अभिनयाची आजही चर्चा होताना दिसते. अलका कुबल यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी लोकप्रिय अभिनेत्री स्मिता पाटील(Smita Patil) यांची आठवण सांगितली आहे. याबरोबरच लक्ष्मीकांत बेर्डे यांचीही आठवण सांगितली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे व अलका कुबल यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. अलका कुबल यांनी त्यांच्या आईच्या संस्कारामुळे पाय जमिनीवर राहतात, असेही म्हटले आहे.
अलका कुबल म्हणाल्या…
अभिनेत्री अलका कुबल यांनी नुकतीच टलोकशाही फ्रेंडलीटला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांची आठवण सांगताना म्हटले, “आई दिवसभर शाळा अटेंड करायची, माझ्याबरोबर शूटला यायची, रात्रीचं शूट असायचं. संध्याकाळी ६ चा कॉल टाइम असायचा. सकाळी पहाटे चार-पाच वाजता पॅक अप व्हायचं; तर आम्ही दोघी निघायचो आणि चेंबूरच्या बस स्टॉपवरून बसमधून दादरला यायचो. दादरहून ट्रेन पकडून घरी यायचो. तर एकदा पहाटे स्मिता पाटील यांनी आम्हाला बस स्टॉपवर पाहिलं. एकतर आम्ही दोघीच, रस्त्यावर कोणीच नाही. आम्हाला पाहिल्यावर त्यांनी गाडी थांबविली. मला व माझ्या आईला त्यांच्या गाडीत घेतलं आणि दादरच्या स्टेशनला सोडलं. मला असं आठवतंय, त्या आईला म्हणाल्या की पुन्हा असं एकटं या मुलीला घेऊन उभ्या राहू नका. वयात आलेली मुलगी आहे. मग त्या रोज पॅक अप झालं की आम्हाला दादर स्टेशनला सोडायच्या.”
लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सांगताना अलका कुबल यांनी म्हटले, “मी माझ्या दोन्ही मुलींना चौथ्या महिन्यापासून शूटिंगला न्यायचे. गिरीश ओकने मला झाशीची राणी असंच नाव ठेवलं होतं. कारण मी माझ्या दोन्ही मुलींना असंच शूटिंगच्या सेटवर नेलं, त्यांना वाढवलं. मला असं वाटायचं की, आईच्या कर्तव्यात मी कुठे कमी पडायला नाही पाहिजे. आईचं दूध त्यांना मिळायला पाहिजे. त्या दृष्टीने मी त्यांना सगळीकडे घेऊन जायचे. जेव्हा आपण चौथ्या महिन्यापासून त्यांना खाणं बनवतो, तेव्हा मी ते कुठल्यातरी हॉटेलमध्ये जाऊन किचनमध्ये बनवायचे. लक्ष्याने ते पाहिलं आणि जेव्हा तो पुढच्या शेड्यूलला भेटला त्यावेळी त्याने मला हॉटप्लेट भेट आणली. आता हॉटप्लेट सामान्य आहे. त्यावेळी आम्हाला खूप वाटलं”, अशी आठवण त्यांनी सांगितली.
याबरोबरच आईबद्दल बोलताना अलका कुबल यांनी म्हटले, “आईने सांगितले की या क्षेत्रात जात आहेस, पण नीट वागलीस, काही चुकीचं पाऊल नाही पडलं तर मी तुला पाठिंबा देईन. वडिलांनीदेखील तितकाच पाठिंबा दिला. माझे वडील माझ्या वयाच्या १५ वर्षी गेले, त्यामुळे आईने आम्हाला वाढवलं. आम्हाला चार भावंडांना वाढवलं. जे संस्कार आहेत ते शिक्षिका म्हणून तिचे आहेत. एकतर तिचा धाक खूप होता. आम्ही आईला प्रचंड घाबरायचो आणि आम्ही तिचे कष्टही पाहिलेत. मला असं वाटतं की, नकळत आमच्यावर संस्कार झाले आहेत, त्यामुळे कितीही यश कमवलं तरी ते दिवस विसरत नाही. यश डोक्यात जात नाही, पाय जमिनीवर राहतात”, अशा भावना अलका कुबल यांनी व्यक्त केल्या आहेत.