मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीचे नाव घेतले जाते. सध्या सोनाली ही तिच्या व्हिक्टोरिया या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट एक भयपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सोनालीने काही वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगितला आहे. यावेळी तिने अमेय वाघबद्दलही सांगितले.
सोनाली कुलकर्णी ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. सोनालीने नुकतंच भारतीय डिजीटल पार्टी या चॅनलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने अमेय वाघबरोबर तिच्या घरी घडलेला एक रंजक किस्सा सांगितला.
आणखी वाचा : “आमच्यात वैर…” अमृता खानविलकरचा फोटो पाहताच सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली
सोनाली कुलकर्णीने सांगितलेला रंजक किस्सा
“माझ्या पुण्यातील घरी असलेल्या रुममध्ये तात्या विंचू आहे. त्यामुळे कोणीही माझ्या रुममध्ये येत नाही. मी चित्रपट केल्यानंतर मला त्यांनी तो भेट म्हणून दिला. मला त्याची अजिबात भीती वाटत नाही. पण एकदा अमेय वाघ माझ्या घरी आला होता. आम्ही दोघेही ‘शटर’च प्रमोशन करत होतो. मी पुण्यातील निगडी परिसरात राहते. तेव्हा रात्री उशिरा प्रमोशन करुन घरी परतलो. त्यावेळी सर्वच स्ट्रगल करत असल्याने कोणाकडे गाडी वैगरे असं काही नव्हतं. खूप रात्र झाली होती, म्हणून मी त्याला ‘माझ्याच घरी राहा’ असं सांगितलं होतं.
‘तू माझ्या खोलीत झोपू शकतो, मी गेस्ट रुममध्ये झोपेन’ असं त्याला सांगितलं होतं. पुण्यातील त्या घरात माझी खोली अगदी शेवटच्या मजल्यावर, कोपऱ्यात आणि शांतता असलेल्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी कोणी कितीही आरडाओरड केली, तरी कोणालाही कळणार नाही अशा ठिकाणी ती रुम आहे.
मी अमेय वाघला ‘तू माझ्या खोलीत झोप’ असं सांगितलं होतं. तोही छान आनंदात होता. ‘मी तुझ्या खोलीत झोपणार’ वैगरे त्याने म्हटले आणि तो तिकडे गेला. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात तो आरडाओरडा करत किंचाळत बाहेर आला. ‘तुझ्या खोलीत तात्या विंचू आहे’, असं त्याने मला घाबरत घाबरतच सांगितलं.
त्यावेळी मी त्याला ‘हो ती बाहुली आहे, काहीही नाही झोप’, असं म्हटलं. त्यावर तो म्हणाला, ‘मी तिथे झोपणार नाही. मी गेस्ट रुममध्ये झोपेन किंवा तू मला रिक्षा, टॅक्सी करुन दे, मी माझ्या घरी जातो’, असे मला त्याने सांगितले.”
आणखी वाचा : सोनाली कुलकर्णी मालदिवमध्ये राहत असलेल्या रिसॉर्टचे एक दिवसाचे भाडे माहितेय का?
दरम्यान सोनाली कुलकर्णीने हा रंजक किस्सा सांगितल्यानंतर सर्वजण जोरजोरात हसू लागले. विशेष म्हणजे यावेळी तिने तिच्या घरी तात्या विंचू आहे, ही गोष्टही उघड केली. दरम्यान सोनाली कुलकर्णीचा व्हिक्टोरिया हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे.