अमृता खानविलकर हे असं एक नाव आहे, जिने आपल्या नृत्यातून प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडली. तिने आजवर मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीत अनेक मालिका, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शो केले. तिच्या सहज-सुंदर अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहे, त्याच्याहून दुप्पट तिचा नृत्य आणि अदाकारीचा चाहता वर्ग आहे, असं म्हणायला काही हरकत आहे. आज अमृताचा वाढदिवस आहे, त्याच निमित्ताने तिचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी सिनेसृष्टीतील इतर कलाकारांप्रमाणे अमृता खानविलकर ही मध्यवर्गीय कुटुंबातून आलेली अभिनेत्री. २२ नोव्हेंबर १९८४ साली तिचा जन्म झाला. अमृता ही मूळची मुंबईची. पण १९९३ सालच्या बॉम्बस्फोटानंतर वडील राजू खानविलकर यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यात स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अमृताचं शालेय शिक्षण पुण्यातील कर्नाटक हायस्कूलमध्ये झालं. इंग्रजी माध्यमात तिचं शिक्षण झालं. त्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉर्मसमध्ये झालं.

अमृताला बालपणापासून नृत्याची प्रचंड आवड. तिला कोणीही सांगितलं, एखादं नृत्य करून दाखवं. तर, ती कधीच नकार न देता दुसऱ्या क्षणी त्या गाण्यावर थिरकायची. तिला प्रत्येक गाण्याच्या हूक स्टेप चांगल्याच ध्यानात असायच्या. पहिल्यांदा अमृता गणेशोत्सवातील सार्वजनिक कार्यक्रमात ‘अखियाँ मिलाए, कभी अखियाँ चुराए’ या गाण्यावर थिरकली. वडिलांचा शर्ट, आईचा कोट घालून तिने धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला होता. मग त्यानंतर अमृताला डान्स करण्यासाठी फक्त निमित्त पाहिजे असायचं. ती ओळखीच्या लोकांच्या वाढदिवसामध्येही डान्स करून चॉकलेट, १०० रुपये मिळवायची. तिच्या या नृत्याच्या आवडीमुळेच ती आज प्रेक्षकांचा मनाचा काळजाचा ठोका चुकवते.

हेही वाचा – मी आलो.. मी पाहिलं.. मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं

फोटो साभार – अमृता खानविलकर इन्स्टाग्राम

कला क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अमृताचं मनोरंजनसृष्टीतला प्रवास हा टेलिव्हिजनपासून सुरू झाला. २००४ साली ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या ‘झी टीव्ही’वरील कार्यक्रमात ती पहिल्यांदा झळकली. या कार्यक्रमात तिने तिसरा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर अमृताने अभिनय क्षेत्राकडे वाटचाल सुरू केली. ‘सहारा वन’ वाहिनीवरील ‘अदा’ या मालिकेत तिला भूमिका मिळाली. मग ती अनेक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळू लागली. ‘ई टीव्ही’वरील ‘कॉमेडी एक्सप्रेस’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमृताने केलं होतं. यादरम्यान तिने काही काळासाठी विश्रांती घेतली. पण २०१२मध्ये ती पुन्हा या कार्यक्रमात परतली.

हेही वाचा – तत्त्वज्ञानात पदवी, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव ते चुंबनदृश्यांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री

याआधीच अमृताने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. २००६ला प्रदर्शित झालेला ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘गोलमाल’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. या चित्रपटात तिने दुहेरी भूमिका साकारली होती. अमृताने पहिल्याच मराठी चित्रपटात बहुआयामी अभिनेते भरत जाधव यांच्याबरोबर काम केलं. त्यानंतर अमृताने हिंदी सिनेसृष्टीत ‘मुंबई सालसा’ या चित्रपटाद्वारे नशीब आजमावलं. ‘गोलमाल’, ‘मुंबई सालसा’ या दोन चित्रपटानंतर अमृताची सिनेसृष्टीतील कारकीर्द जोरदार सुरू झाली. ‘साडे माडे तीन’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘गैर’ अशा अनेक चित्रपटात ती झळकली. पण ‘फूंक’ या हिंदी चित्रपटात तिने साकारलेल्या आरती या भूमिकेचं विशेष कौतुक झालं.

अमृतासाठी २०१० सालं खास होतं. कारण ‘नटरंग’ या चित्रपटातील ‘वाजले की बारा’ या गाण्यामुळे तिचं नशीब पालटलं. या चित्रपटात अमृता कुठल्याही भूमिकेत नसली तरी तिचं नृत्य कौशल्य, अदाकारी यामुळे ती चांगलीच भाव खावू गेली. ‘वाजले की बारा’ गाण्यातील तिच्या लावणीने अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलं. तेव्हापासून अमृताचं नृत्य पाहणं पर्वणी होऊ लागलं.

फोटो साभार – अमृता खानविलकर इन्स्टाग्राम

‘नटरंग’ या चित्रपटानंतर ‘फूंक २’, ‘अर्जुन’, ‘झकास’, ‘धूसर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘सतरंगी रे’, ‘शाळा’, ‘आयना का बायना’, ‘हिम्मतवाला’, ‘बाजी’, ‘वेलकम जिंदगी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘वन वे तिकीट’, ‘बस स्टॉप’, ‘राझी’, अशा अनेक मराठी, हिंदी चित्रपटात अमृता झळकली. अमृता जितकी चित्रपटामुळे चर्चेत होती तितकीच रिअ‍ॅलिटी शोमुळे चर्चेत राहिली. ‘नच बलिये’च्या ७व्या पर्वाचे विजेते अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा ठरले होते.‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी’ अशा अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला होता.

हेही वाचा – अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल

२०२२ सालं अमृताने चांगलंच गाजवलं. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील अमृताची ‘चंद्रा’ प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. तिने साकारलेल्या चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकर भूमिकेचं फार कौतुक झालं. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कारही मिळाले. ‘वाजले की बारा’ या गाण्याप्रमाणे अमृताच्या ‘चंद्रा’ या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. सगळीकडे हे गाणं वाजू लागलं. या चित्रपटामुळे अमृताला ‘चंद्रा’ ही नवी ओळख मिळाली. या लाडक्या चंद्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta khanvilkar birthday special her journey in marathi and hindi industry pps
Show comments