प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकरने साकारली होती. मात्र अभिनेत्री मानसी नाईक हिने मला या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती, असा दावा केला होता. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. नुकतंच याबद्दल अमृता खानविलकरने स्पष्टपणे मत मांडलं आहे.
अमृता खानविलकरने नुकतंच ‘पटलं तर घ्या’ या प्लॅनेट मराठीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिला मानसी नाईकने ‘चंद्रमुखी’बद्दल केलेल्या दाव्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी तिने थेट उत्तर दिलं.
आणखी वाचा : “मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती…”, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक दावा
अमृता खानविलकर काय म्हणाली?
“हे आपल्या सिनेसृष्टीत कायमच घडतं. अनेकदा हे असं घडताना दिसतं. ‘चंद्रमुखी’ हा विषय तसा खुला होता. त्याचे राईट्स दोन वर्षांपूर्वी अक्षय बर्दापूरकरने विकत घेतले. त्याआधी अनेक वर्ष अनेक लोक जाऊन विश्वास पाटील यांना विचारणा करत होते. माझं याबद्दल मानसीबरोबर काहीही बोलणं झालं नाही. पण मला असं वाटतंय की, कोणीतरी हा प्रोजेक्ट करत असावा आणि कोणीतरी तिला त्यासाठी विचारणा केली असावी.
पण त्यात काहीही वावगं नाही. मला अशा अनेक चित्रपटांसाठी विचारणा करण्यात आली. पण त्यानंतर पुढे त्यात कोणीतरी वेगळीच अभिनेत्री दिसते. त्यामुळे हे सिनेसृष्टीत कायमच घडताना दिसतं. मी प्रियांका चोप्राचं एक वाक्य तुम्हाला सांगू इच्छिते, “माझ्या आधी कोणाला विचारलं गेलंय किंवा नाही गेलंय, याचा मला काहीही फरक पडत नाही. मी ते पात्र करते, जेव्हा मी त्या चित्रपटाच्या सेटवर जाते.”
मी त्या सेटवर गेले आणि तो रोल केला. ‘चंद्रमुखी’ त्याआधी १०० लोकांनी किंवा दोन-चार लोकांनी प्लॅन केली असेल, याची मला काहीही कल्पना नाही. पण जेव्हा प्रसाद ओक माझ्याकडे ‘चंद्रमुखी’ घेऊन आला, तेव्हा त्याने मला माझी ‘चंद्रमुखी’ मात्र तूच आहेस, असं सांगितलं होतं”, असे अमृता खानविलकरने म्हटले.
आणखी वाचा : ‘माझ्या डोक्यात फक्त अमृता…”, ‘चंद्रमुखी’वरुन होणाऱ्या वादावर दिग्दर्शक प्रसाद ओकने दिले उत्तर
दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर ही मुख्य भूमिकेत होती. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे झळकला होता.
या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी विविध अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. यात मानसी नाईक, प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी, पुजा सावंत यांसह मराठीतील विविध प्रसिद्ध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा रंगली होती. त्यातच एका मुलाखतीदरम्यान मानसी नाईकने मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती असे म्हटले होते. त्यानंतर बराच वाद झाला होता.