Amruta Khanvilkar Lavani Dance : सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ लावणीची जोरदार चर्चा सुरू आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकरने ‘देवमाणूस’ चित्रपटात पहिल्यांदाच लावणी सादर केली आहे.
‘देवमाणूस’च्या निमित्ताने सई मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच लोककला सादर करताना दिसली. सईच्या दिलखेचक अदा, एनर्जी या गाण्यात विशेष लक्षवेधी ठरली. आता सईच्या या लावणीवर बरेच सेलिब्रिटी थिरकताना दिसत आहेत. गाणं प्रदर्शित झाल्यापासून अनेक सोशल मीडिया स्टार, मराठी कलाकारांनी ‘आलेची मी’ लावणीवर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. आता या पाठोपाठ लोकप्रिय अभिनेत्री व नृत्यांगना अमृता खानविलकरने सईच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
अमृता खानविलकर उत्तम अभिनेत्री आहेच. पण, याशिवाय अमृता तिच्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. आजवर ‘वाजले की बारा’, ‘चंद्रा’, ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ अशी असंख्य गाणी अमृताने गाजवली आहेत. आता अभिनेत्रीने मैत्रिणीच्या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.
अमृता खानविलकरने कोरिओग्राफर आशीष पाटीलच्या साथीने ‘आलेच मी’ गाण्यावर जबरदस्त लावणी केली. ऑफ व्हाइट रंगाची नऊवारी साडी, नाकात नथ आणि मोकळे केस असा लूक करून अमृताने ‘आलेच मी’ गाण्यावर भन्नाट डान्स केला. सध्या हा व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे. अमृताची एनर्जी पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सईने अमृताच्या डान्सवर “Hayeee!” अशी कमेंट केली आहे. तर, अमृताने तिला “ए बेबी…” असा रिप्लाय दिला आहे.
याशिवाय मंजिरी ओक, अनुष्का सरकटे, बेला शेंडे, रोहन प्रधान, लव्ह फिल्म्स यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. तर अन्य नेटकऱ्यांनी “ताई जेव्हा स्टेजवर येते, तेव्हा तिच एनर्जी असते”, “वाह अमू”, “Og लावणी क्वीन”, “अमृता ताईंसारखा डान्स कोणालाच जमणार नाही”, “कमाल अमृता” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.