मराठी कलाविश्वाची ‘चंद्रमुखी’ म्हणून अमृता खानविलकरला ओळखलं जातं. गेल्यावर्षी दिवाळी मुहूर्तावर अभिनेत्रीने नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. यानंतर यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमृताने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. तिचं अनेक वर्षांपासूनचं गृहस्वप्न यानिमित्ताने साकार झालं. पण, मुंबईत हक्काचं घर घेण्याचा प्रवास एवढा सोपा नव्हता. याबद्दलचा अनुभव अमृताने तिच्या युट्यूब चॅनेलवर चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमृता म्हणाली, “आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा मला आणि हिमांशूला आमचं घर भाड्याने द्यावं लागलं होतं. त्यानंतर असं झालेलं की, आता स्वत:चं घर नकोच बाबा…आपण भाड्याच्या घरात राहूयात. मी ३ वर्षे भाड्याच्या घरात राहिले. माझ्याकडे तेव्हा काहीच नव्हतं. अगदी ‘चंद्रमुखी’ सिनेमा ५० दिवस थिएटरमध्ये सुरू होता पण, खरंच सांगते तेव्हाही माझ्याकडे पैसे नव्हते. मात्र, त्या दरम्यान मनात जिद्द नक्कीच होती की, आपलं घर घ्यायचं.”

“हक्काचं घर घेणं खरंच खूप अवघड आहे कारण, मागच्यावर्षी हे मी हे घर बूक केलं आणि आईचं हार्टचं ऑपरेशन करावं लागलं. पण, सगळं व्यवस्थित झालं. माझी आई त्या कठीण प्रसंगातून बाहेर आली आणि घराचं पझेशन सुद्धा मिळालं. मी सर्टिफाईड योगा टिचर आहे. त्यामुळे मॅटवर मला घरासाठी ‘एकम’ हे नाव सुचलं. एकम म्हणजे १…ही माझ्या घराची टोटल सुद्धा आहे. माझं हे पहिलं घर आहे, ज्याला मी नाव देऊ शकले. आतापर्यंतचा प्रवास मी बेधडकपणे पार पाडला, तसाच मला इथून पुढचा प्रवास सुद्धा बेधडकपणे पार पाडायचा आहे.” असं अमृता खानविलकरने सांगितलं.

“नव्या वर्षाची, नवी सुरुवात. गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम’. ‘एकम’ म्हणजे एक – जिथून सगळंच नव्याने सुरू होतं. उत्सुकता, समाधान, प्रेम आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ. तुमच्या शुभाशीर्वादांची साथ अशीच कायम राहू दे! मुंबईत घर घेणं हे खूपच स्वप्नवत वाटतंय” अशा भावना अमृताने व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अमृता नुकतीच ‘लाईक आणि सबस्क्राईब’ झळकली होती. यामध्ये तिच्याबरोबर अमेय वाघ, शुभंकर तावडे, राजसी भावे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.