Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh : मराठी कलाविश्वाची ‘चंद्रमुखी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृता खानविलकरने गेल्यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. आता नव्या वर्षात अभिनेत्रीने या घरात आपल्या कुटुंबीयांसह गृहप्रवेश पूजा केल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत हक्काचं, मोठं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीत नावलौकिक मिळवलेल्या अमृताचं हे गृहस्वप्न अखेर साकार झालं आहे.
अमृताने तिच्या नव्या घराचं नाव ‘एकम’ असं ठेवलेलं आहे. अभिनेत्रीने गृहप्रवेश करताना अतिशय सुंदर लूक केला होता. लाल रंगाची सुंदर साडी, गळ्यात नेकलेस, केसात गजरा या पारंपरिक लूकमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत होती. नव्या घरात गृहप्रवेश करताना अभिनेत्रीची बहीण व आई-बाबा देखील उपस्थित होते. अमृताने मुंबईत घेतलेलं हे नवकोरं घर २२ व्या मजल्यावर आहे.
अमृताने गृहप्रवेशाची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्री लिहिते, “नव्या वर्षाची, नवी सुरुवात. गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम’. ‘एकम’ म्हणजे एक – जिथून सगळंच नव्याने सुरू होतं. उत्सुकता, समाधान, प्रेम आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ. तुमच्या शुभाशीर्वादांची साथ अशीच कायम राहू दे!”
अमृताच्या या नव्या घराच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्वप्नील जोशी, आशिष पाटील, मंजिरी ओक, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, सोनाली खरे, नंदिता पाटकर, सावनी रविंद्र या कलाकारांनी कमेंट्स करत अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
नव्या घराविषयी अमृता म्हणते, “आयुष्यात नेहमीच मला असं स्वतःचं घर हवं होतं, जे माझ्या मेहनतीने आणि प्रेमाने तयार झालेलं असावं. माझ्या कुटुंबासाठी, मित्र-मैत्रिणींसाठी याशिवाय निर्वाण आणि नूर्वीसाठी मला एक असं घर हवं होतं… अशा घरात जिथं आम्ही सगळे एकत्र येऊ शकतो, आमच्या आयुष्यातले खास क्षण साजरे करू शकतो आणि जीवनातील सुंदर क्षण अनुभवू शकतो. मुंबईत घर घेणं हे खूपच स्वप्नवत वाटतंय”
दरम्यान, अभिनेत्रीच्या ( Amruta Khanvilkar ) कामाबद्दल सांगायचं झालं तर, अमृता नुकतीच ‘लाईक आणि सबस्क्राईब’ झळकली होती. यामध्ये तिच्याबरोबर अमेय वाघ, शुभंकर तावडे, राजसी भावे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.