‘नटरंग’, ‘राजी’, ‘चंद्रमुखी’, ‘सत्यमेव जयते’, अशा लोकप्रिय चित्रपटांत अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)ने भूमिका केल्या आहेत. अभिनयाबरोबर अमृता तिच्या नृत्यासाठीदेखील ओळखली जाते. सोशल मीडियावर अमृता सक्रिय असते. फोटो, रील, डान्स अशा माध्यमांतून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत २०२४ हे वर्ष कसे होते, मानसिक आरोग्य कसे जपले पाहिजे, मुलींसाठी आर्थिक स्थैर्य का महत्त्वाचे आहे, अशा अनेकविध गोष्टींवर वक्तव्य केले आहे.
काय म्हणाली अमृता खानविलकर?
अमृता खानविलकरने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत २०२४ या वर्षाबद्दल बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “या वर्षात चांगलं आणि वाईट या दोन्हीचं संतुलन होतं. मला कधीच वाटलं नव्हतं की, माझ्या आईचं ऑपरेशन होईल आणि ते अशा प्रकारे होईल. एका शोसाठी ती व मी बँकॉकला गेलो होतो. तिथे तिचा हात पूर्णपणे वाकडा झाला होता. मला दिसला. ती थरथरायला लागली आणि एकदम बसली. तुमचे पालक म्हातारे होत असलेले पाहणं हे माणसासाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे. मला तो धक्का बसला. दोन मिनिटं काही सुधरलंच नाही. अख्खी दुनिया बंद पडल्यासारखं झालं होतं मला. आम्ही परत आलो. मग इसीजी वगैरे केलं. त्यातून कळलं की, तिला ९५ टक्के ब्लॉकेज आहेत. तेव्हाच मी घराचा व्यवहार करीत होते. मला कळतच नव्हतं. एका बाजूला चांगलंही होतंय आणि दुसऱ्या बाजूला आईचं ऑपरेशनही होतं. जेव्हा मी पाहिलं की, तिचं ऑपरेशन कसं झालं. ती ऑपरेशनसाठी तयारच नव्हती. तीन वर्षांपूर्वी हृदयविकारामुळे मावशीचं निधन झालं आहे. त्यामुळे त्याचा जास्त त्रास होत होता. या वर्षात मला माझ्यावर, देवावर विश्वास वाढला.”
मानसिक, भावनिक आरोग्य कसं जपतेस, या प्रश्नावर बोलताना अमृताने म्हटले, “जेव्हा माझे मानसिक आरोग्य नीट नव्हते, त्यावेळी ते कसे ठीक करायचे माहीत नव्हते. कारण- आयुष्यात चढ-उतार हे असतात. वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक असो. तेव्हा शिकवलं गेलं नाहीये. आमच्या घरी आम्हाला शिकवलं गेलं नाही की, जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर व्हायचे असेल, तर काय केलं पाहिजे, हे शिकवलं गेलं नाहीये. ते मी दुनियादारी करता-करता शिकले आहे. खूप चुकाही झाल्या आहेत; पण त्यातून मी स्वत:ला सावरलंही आहे. मला असं वाटतं की जप, नामस्मरण करावं. स्वामींनी मला खूपच तारून नेलं आहे. मी असा विचार करते की, जेव्हा तुम्हाला कोणालाही जाणीवपूर्वक दुखवायचं नसतं तेव्हा देव तुमची काळजी घेतो. तसंच काहीसं झालं.”
मुलींना संदेश देताना अमृताने म्हटले, “ही जी भावनिक स्थैर्यता असते ना, ती खूप महत्त्वाची असते. जेव्हा आर्थिक स्थैर्यता येते, त्यावेळी ती कुठेतरी भावनिक स्थैर्यतासुद्धा येते. जेव्हा तुम्हाला कळतं की, तुम्ही हे कमवू शकता, घेऊ शकता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमचा तुमच्या देवावर विश्वास वाढतो.”
याबरोबरच अमृताने नुकतेच एक घर घेतले आहे. त्यामुळे अभिनेत्री काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. घराची संकल्पना माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे, असे अभिनेत्रीने म्हटले आहे. आता अभिनेत्री कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.