अमृता खानविलकरने ‘गोलमाल’ चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं परंतु, ‘नटरंग’मधील ‘वाजले की बारा’ या लावणीमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या अमृताने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘सत्यमेव जयते’, ‘राझी’, ‘फूंक’ अशा हिंदी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनयाशिवाय स्वत:ची आवड व नृत्यकला जपण्यासाठी अमृताने तिचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. या चॅनेलवर अभिनेत्रीने नुकतीच ‘दिलखुलास गप्पा’ ही नवीन सीरिज सुरू केली आहे. या सीरिजच्या पहिल्या भागात अमृताने तिच्या सगळ्या चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत कमेंट्समध्ये त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

अमृताला तिच्या एका चाहतीने तिला ‘चंद्रमुखी’ चित्रपटादरम्यान निर्माण झाल्यावर वादावर प्रश्न विचारला आहे. अमृता खानविलकरने गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी यात चंद्रमुखी कोण साकारणार? याबद्दल बरेच संभ्रम निर्माण झाले होते. एका मुलाखतीत मानसीने ‘चंद्रमुखी’ चित्रपटासाठी तिला आधी विचारणा झाल्याचं सांगितलं आणि यावरून या संपूर्ण वादाला सुरुवात झाली होती. या वादावर अमृताच्या एका चाहतीने तिला प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा : “मागच्या तीन वर्षांपासून…”, ‘खाशाबा’चं शूटिंग सुरू झाल्यानंतर नागराज मंजुळेंचे विधान

चाहती लिहिते, “हॅलो अमू…चंद्रमुखीच्या वेळेस मानसी नाईक खूप काही बोलली होती, तसंच तुझ्यावर तिने अनेक आरोप केले. पण, या सगळ्यात तू कधीच काही बोलली नाहीस. याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कारण, या सगळ्यात तुझी प्रतिमा नकारात्मक होणं योग्य नाही.”

अमृताने चाहतीच्या या प्रश्नावर, “कधी कधी आपण तुम्हाला चांगल्या शुभेच्छा असं म्हणत पुढे जायचं असतं. मला वाटतं आपण प्रत्येकजण संघर्ष करतोय…अगदी मी सुद्धा आणि म्हणूनच आपल्यातील चांगली वृत्ती कधीच सोडायची नाही. मी नेहमीच सगळ्यांचं चांगलं व्हावं असा सकारात्मक विचार करेन” असं उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : Animal Review: वडील-मुलाच्या विचित्र नात्याची, आजवर कधीही न ऐकलेली अन् पाहिलेली अस्वस्थ करणारी ‘हिंसक’ गोष्ट

amruta
अमृता खानविलकर

दरम्यान, अमृता खानविलकरच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती प्रेक्षकांना ‘कलावती’ आणि ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.