‘वाजले की बारा’, ‘चंद्रा’ अशा गाण्यांचा उल्लेख जरी केला तरी अभिनेत्री अमृता खानविलकरचं नाव डोळ्यासमोर येतं. ‘गोलमाल’ चित्रपटातून तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. गेल्या काही वर्षांत अमृताने मराठीसह हिंदी कलाविश्वात तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती ‘लुटेरे’ या सीरिजमुळे प्रचंड चर्चेत आहे. अमृताने नुकत्याच ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत या सीरिजच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला.
करोना काळात दक्षिण आफ्रिकेत लुटेरेचं शूटिंग सुरू होतं. अमृता सुद्धा खास शूटिंगसाठी संपूर्ण टीमबरोबर त्याठिकाणी रवाना झाली होती. याबद्दल अभिनेत्री सांगते, “दक्षिण आफ्रिकेत आम्ही ज्या ठिकाणी शूटिंग करत होतो ती जागा म्हणजे पृथ्वीवरचा सर्वात मोठा स्लम एरिया होता. जसा धारावी परिसर आपल्या आशियात सर्वात मोठा आहे, अगदी तसाच दक्षिण आफ्रिकेतील तो भाग पृथ्वीवरची सर्वात मोठी झोपडपट्टी आहे.”
अमृता पुढे म्हणाली, “त्या भागात साधी-साधी आफ्रिकन लोक सुद्धा बंदुका घेऊन फिरत होती. माझ्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी व्हॅनमध्ये बसले होते आणि त्या गाडीचं दार मी उघडं ठेवलं कारण, मला प्रचंड गरम होत होतं. तेवढ्यात सेटवरचा एक मुलगा पळत-पळत आला आणि म्हणाला, मॅडम तुम्ही प्लीज सगळं बंद करून बसा…तुम्हाला इथून किडनॅप करुन घेऊन जातील आणि आम्ही काहीच करू शकणार नाही. आता हे सांगणं खूप सोपं आहे. पण, तेव्हा माझ्या मनात खरंच एक भीती निर्माण झाली होती.”
हेही वाचा : शूटिंगच्या सेटवर सई ताम्हणकरला चावलेलं माकड, किस्सा सांगत म्हणाली, “आधी सगळे हसले अन् मग ३-४…”
“करोना काळादरम्यान आमचं शूटिंग सुरू होतं. त्यामुळे तिथेही आर्थिक चणचण वगैरे होती. अगदी अलीकडच्या काळात आफ्रिकेतील निर्बंध उठवण्यात आलेत. त्या भागात माफिया, गुन्हेगारी, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. अशा ठिकाणी शूटिंग करण्याचा अनुभव काहीतरी वेगळाच होता. कारण, आपण भारतात खरंच खूप जास्त सुखी आहोत. आपल्याला जे पाहिजे ते आपण बोलू शकतो, आपल्याला हवं तिथे फिरू शकतो पण, त्या ठिकाणी एवढ्या सोयीसुविधा नव्हत्या.” असं अमृता खानविलकरने सांगितलं.