अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ‘सुशीला-सुजीत’ या मराठी चित्रपटातील ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ या गाण्यातून नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या गाण्यात अमृताबरोबर अभिनेता गश्मीर महाजनी दिसला होता. दोघांनी त्यांच्या डान्सने लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता अमृता तिच्या कामामुळे नाही तर तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने एका मुलाखतीत तिच्या घराला एकम हे नाव का दिले याबद्दल वक्तव्य केले आहे.
अमृता खानविलकरने गेल्या वर्षी तिचे हक्काचे घर घेतले. या घराला अभिनेत्रीने एकम असे नाव दिले. घर घेतल्याची व पूजा केल्याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली होती. तसेच घराचे नाव एकम असे असल्याचेदेखील तिने सोशल मीडियावर सांगितले होते. घर घेतल्यानंतर तिने याबद्दल अनेक मुलाखतीत तिचा आनंदही व्यक्त केला होता. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने घराचे नाव एकम का ठेवले याचा खुलासा केला आहे.
अमृता खानविलकर काय म्हणाली?
अमृता खानविलकरने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत घराच्या नावाबद्दल अमृता खानविलकर म्हणाली, “माझ्या फ्लॅटची पूर्ण टोटल ही एक येते, तर एक हा नंबर माझ्यासाठी स्पेशल आहे. मला आठवतं की, मी एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते, त्याचा नंबर ६०४ किंवा ७०३ असा काहीतरी होता. त्या फ्लॅटमध्ये राहत असताना मला ‘वाजले की बारा’ हे गाणं मिळालं होतं, ते घर माझ्यासाठी अत्यंत आयुष्य बदलणारं घर होतं.”
“सुदैवाने असं झालं की, वास्तु वगैरे सगळं दाखवून आम्ही ते आटोपशीर, छोटसं, छानसं घर घेतलं. त्याची टोटल एक आली. मी योगा करते. मी सर्टिफाइड योगा टीचर आहे. मी मॅटवर असताना विचार करत होते की, फ्लॅट नंबर वगैरे सगळं ठीक आहे. आपण बंगला तर घेऊ शकत नाही, अगदी त्याला बंगल्याचं नाव द्यायला; तर आपण घर घेतलं आहे, त्याला आपण छोटसं नाव देऊयात. सूर्यनमस्कार करत असताना जेव्हा आपण हात वर करतो, तेव्हा त्याला एकम असे म्हणतात. मी विचार केला की हे छान आहे. मला हे मॅटवर सुचलेलं नाव आहे. तर घराला मी एकम असं नाव दिलं, ज्याची टोटल एक आहे”, असे म्हणत अमृता खानविलकरने एकम हे नाव का दिलं, याबद्दल खुलासा केला आहे.
अमृता खानविलकरने घराबद्दल पोस्ट शेअर करीत म्हटले होते की, नव्या वर्षाची नवी सुरुवात. गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम.’ ‘एकम’ म्हणजे एक, जिथून सगळंच नव्याने सुरू होतं. उत्सुकता, समाधान, प्रेम आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ.”
दरम्यान, अभिनेत्री अभिनयाबरोबरच तिच्या नृत्यासाठीदेखील ओळखली जाते. याबरोबरच अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर ती विविध व्हिडीओ शेअर करीत प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असते. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.