प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला-सुजीत’ या आगामी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. या सिनेमातील “चिऊताई-चिऊताई दार उघड” या गाण्याचा धमाकेदार लॉन्चिंग सोहळा नुकताच पार पडला. या आयटम साँगमध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना अमृता खानविलकर आणि गश्मीर महाजनी यांची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे. लॉन्चिंग सोहळ्यात गश्मीर आणि अमृताने लाइव्ह परफॉर्मन्स सादर करत सर्वांची मनं जिंकून घेतली.
मराठी मनोरंजन विश्वात एकापेक्षा एक सुपरहिट लावण्या सादर केल्यावर आता अमृता, ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटात पहिल्यांदाच आयटम साँग सादर करणार असून, तिच्या नृत्याची पुन्हा एकदा एक वेगळी जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या गाण्यात अमृता आणि गश्मीरच्या जबरदस्त लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि मूळ गाण्यात दोघंही जबरदस्त एनर्जीने नाचले आहेत.
“चिऊताई-चिऊताई दार उघड” हे गाणं रुईया महाविद्यालयात लॉन्च झाल्यावर अमृताने उपस्थित चाहत्यांशी व महाविद्यालयीन मुलांशी संवाद साधला. यावेळी अमृताला, “चिऊताई-चिऊताई’ या गाण्यात काम करण्याचा अनुभव कसा होता” असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल अभिनेत्रीने नेमकं काय सांगितलंय, जाणून घेऊयात…
अमृता या गाण्याविषयी म्हणाली, “काय सांगू… ‘चिऊताई-चिऊताई’ गाण्याचा अनुभव खूपच कमाल होता. एकतर सगळी घरातली मंडळी होती. प्रसाद, मंजू, स्वप्नील, संजय मेमाणे या सगळ्यांनी जेव्हा हे गाणं मला ऑफर केलं तेव्हाच मला ते खूप आवडलं होतं. मी त्यांना म्हणाले होते, जर दुसरं कोणी मला गाण्यात दिसलं… तर, तुम्ही फक्त बघाच मी तुमचं काय करते. पण, खरंच हे एकंदर गाणं करताना मला खूप धमाल आली.”
पुढे, गश्मीर म्हणाला, “मलाही गाणं करताना खूप मजा आली. कारण, मला अमृताबरोबर एक तरी आयटम नंबर करायचं होतं. यापूर्वी आम्ही ‘झलक दिखला जा’मध्ये एकत्र होतो. पण, त्यावेळी आम्ही सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून आम्ही सहभागी झालो होतो. त्यामुळे आम्हाला एकत्र डान्स करण्याची संधी मिळाली नव्हती. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, इंडस्ट्रीतल्या ज्या लोकांनी या गाण्याची लहानशी झलक पाहिली त्यांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की, ‘अरे या दोघांना एवढे दिवस एकत्र का नाही आणलं?’ सर्वांनी आम्हाला चांगल्या शुभेच्छा दिल्या, आमचा असा चांगला विचार केला यासाठी खूप खूप आभार!”
दरम्यान, स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सुशीला- सुजीत’ हा सिनेमा १८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा व दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसाद ओकने सांभाळली आहे. तसेच ‘सुशीला सुजीत’ ( Susheela Sujeet ) या चित्रपटाची निर्मिती प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी आणि स्वप्नील जोशी असे पाच जण मिळून करणार आहेत. प्रेक्षक सुद्धा ही आगळीवेगळी कथा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.