रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट आता प्रेक्षकांना मराठीत पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या मराठी प्रीमियरला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये रणदीप हुड्डासह अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रमुख भूमिकेत झळकली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका अंकिताने साकारली आहे. या चित्रपटाच्या मराठी स्क्रिनिंगला अमृता खानविलकरने देखील खास उपस्थिती लावली होती.
अंकिता आणि अमृता या दोघीही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. अमृता याआधी लाडक्या मैत्रिणीला पाठिंबा देण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात देखील पोहोचली होती. याशिवाय अंकिताच्या लग्नात सुद्धा अमृताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या नुकत्याच पार पडलेल्या प्रीमियर शोला सुद्धा तिने हजेरी लावली होती.
हेही वाचा : “खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल प्रसाद ओकची प्रतिक्रिया; म्हणाला…
चित्रपट पाहिल्यावर अमृताने रणदीपसह अंकिताचं कौतुक करण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री लिहिते, “‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट मराठीत पाहण्याची संधी मिळाली. रणदीप सरांचं अभिनय कौशल्य अद्भूत आहे. त्यांच्या डोळ्यातील तेज, चित्तथरारक सिनेमॅटोग्राफी…खरंच सगळा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. चित्रपटातील काही क्षण पाहून तुम्हाला प्रचंड वेदना, दु:ख, मनात राग निर्माण होतो. खरंच हा चित्रपट सर्वांगाने परिपूर्ण आहे.”
हेही वाचा : “पुन्हा रिअॅलिटी शो करणार नाही”, मानसी नाईकने सांगितला अनुभव; म्हणाली, “अभिनेत्रींमध्ये भांडणं, गॉसिप…”
“अंकिता लोखंडे तू यमुनाबाई यांची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली असून तुझं सादरीकरण अविस्मरणीय आहे. हॅट्स ऑफ टू यू अंकु…. क्या बात हैं! आणि सर्वात शेवटी मी कौतुक करेन सुबोध भावेचं…तुझ्या आवाजात जादू आहे. तुझ्या आवाजामुळे मला चित्रपटातील प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती आणि भावना यांचं गांभीर्य जाणवलं. खूपच उत्कृष्ट” अशी पोस्ट शेअर करत अमृताने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, अमृताने शेअर केलेल्या पोस्टवर अंकिता, सुबोध भावे यांनी कमेंट करत तिचे आभार मानले आहेत. याशिवाय ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट २२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या काही दिवसांपासून हिंदीसह मराठी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने यशस्वी घोडदौड केली आहे. रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे, अमित सियाल या कलाकारांनी यामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.