Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते. अलीकडच्या काळात ती हिंदी आणि मराठी प्रोजेक्टमध्ये प्रचंड व्यग्र आहे. मराठी चित्रपटांसह ती हिंदी चित्रपट व अनेक वेब सीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. अभिनय व नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकणारी अमृता सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अभिनेत्री आईबरोबरचेही अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
अमृताने गेल्या वर्षी तिच्या आईच्या आजारपणाबद्दलची एक पोस्ट शेअर केली होती आणि ही पोस्ट पाहून अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. शस्त्रक्रियेनंतर अमृताची आई जेव्हा घरी आली, तेव्हाचा व्हिडीओ शेअर करत तिने एक लांबलचक पोस्ट शेअर केली होती आणि आईची ओपन हार्ट सर्जरी झाल्याचं सांगितलं होतं. आईच्या आजारपणाच्या याच कठीण काळाबद्दल अमृताने पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अमृताने आईच्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितलं.
याबद्दल अमृता असं म्हणाली की, “गेली तीन वर्षे म्हणजे मावशी गेल्यानंतर आई खूपच खचली. त्यानंतर मागच्या वर्षी तिची Open Heart Surgery झाली. काय आहे ना… मी आता घराबद्दल इतकं भरभरून बोलत होते. मागच्या वर्षीच मी घर बुक केलं होतं. तेव्हा एका ठिकाणी मी माझ्या घराच्या डॉक्युमेंट्सवर सह्या करत होते आणि एका ठिकाणी मी माझ्या आईच्या ऑपरेशनच्या पेपरवर सह्या करत होते. आईच्या ऑपरेशनच्या वेळेस मी खूप ढसाढसा रडले होते. म्हणजे इतकी रडले की मला अदितीने सांभाळलं.”

यापुढे अमृताने म्हटलं की, “तेव्हा माझ्यात खूप परिवर्तन झालं. त्यामुळे मला आता असं वाटतं की, सर्वात वाईट वेळ निघून गेला आहे. मी माझ्या मावशीला हृदयविकाराच्या झटक्यामुळे गमावलं. त्यामुळे मी आणि माझी आई खूप घाबरलो होतो. त्यात आईचं हे ऑपरेशन. मला कळतच नव्हतं आयुष्य नक्की कुठे चाललं आहे. त्यात मी आता घर का घेत आहे? मी घर नाही घ्यायला पाहिजे का? असं काहीतरी माझ्या डोक्यात येत होतं.”
यापुढे तिने असं म्हटलं की, “त्या सगळ्यातून मला स्वामींनी तारुण नेलं असं मला वाटतं. ठीक आहे, फक्त त्यातून जा… असं मी स्वत:ला सांगितलं आणि मग मी आपोआप माझ्या आईची आई झाले. मी तिला ओरडतेसुद्धा. तिला आता नाचणी सत्व खायला घालते. बदाम खा. पाणी पी. प्यायलीस का? जेवलीस का? कुठे आहेस? चालायला गेलीस का? असे आमचे आता फोन कॉल्स सुरू असतात.”