आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणून अमृता सुभाष ओळखली जाते. गेले काही दिवस ती तिच्या ‘वंडर वुमन’ या चित्रपटामुळे चांगली चर्चेत आली आहे. अमृताच्या एका पोस्टमुळे ती गरोदर आहे अशी चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. परंतु नंतर अमृताने चित्रपटासंदर्भात एक पोस्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती गेले काही दिवस व्यग्र होती. यादरम्यान ‘आपलं महानगर’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत अमृता सुभाष आणि तिचा नवरा संदेश कुलकर्णी यांनी लग्नानंतर त्यांना मूल न होऊ देण्याचा निर्णय का घेतला यामागचे कारण तिने सांगितलं आहे.
अमृताची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘वंडर वुमन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात उशिरा आई होणाऱ्या जयाची भूमिका तिने साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत “लग्नानंतर काही महिन्यांनीच गोड बातमी कधी देणार असा प्रश्न अनेकींना विचारण्यात येतो. याकडे तू कसं बघतेस?” असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं. हे उत्तर देताना तिने मूल न होऊ देण्याच्या त्यांच्या निर्णयामागची कारणं स्पष्ट करत आजचा काळ कसा बदलला आहे यावरही भाष्य केलं.
आणखी वाचा : “फक्त ३५ सेकंदांचा टीझर पाहून…”; क्रिती सेनॉनचं ‘आदिपुरुष’ला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर
अमृता म्हणाली, “आता काळ बदलत चालला आहे. अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मुलं आवडतात पण त्यांनी मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्यापैकीच एक आम्ही आहोत. मुलं आवडणं आणि ती वाढवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही दोघंही आमच्या आमच्या करिअरमध्ये खूप व्यग्र आहोत. त्यामुळे आम्ही बाळाला वेळ देऊ शकू का? आणि त्याला न्याय देऊ शकू का? असा विचार आमच्या मनात आला. त्यामुळेच आम्ही ठरवलं की आम्हाला बाळ नको.”
पुढे ती म्हणाली, “आमच्या कामावर आमचं खूप प्रेम असल्यामुळे ते आम्ही सोडू शकत नाही. तसंच कामावरच्या प्रेमामुळे बाळाकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही. आमच्यासारखा विचार करणारे अनेकजण आहेत. परंतु आम्हाला मुलं आवडत नाहीत असा याचा अर्थ होत नाही. आमच्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांवर मी खूप प्रेम करते. मी माझी काम करून मला वेळ असेल तेव्हा त्यांच्याशी खेळायला जाऊ शकते. मी करिअरकडे ज्या पद्धतीने पाहते त्यात बाळाचं संगोपन मला करता आलं असतं का असा प्रश्न मला पडतो. बाळ आवडणं आणि त्याला जन्म देऊन त्याचं चांगलं संगोपन करणं यासाठी खूप एनर्जी लागते. ही एनर्जी आमच्यासारख्यांना इतर गोष्टींमध्ये वापराविशी वाटते.”
हेही वाचा : ४३व्या वर्षी अमृता सुभाष होणार आई? व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने सांगितलं सत्य
“आता अनेकजण बदलत्या काळानुसार हा विचार करू लागले आहेत. काळानुसार पूर्णत्त्वाची व्याख्याही बदलली आहे. त्यामुळे एक बाई तिच्या कामामुळे पूर्ण असू शकते किंवा तिच्या असण्याने ती पूर्ण असू शकते. त्याच्यासाठी तिचं लग्न झालं म्हणजे तिचं योग्य झालं, तिला मूल झालं म्हणजे तिचं योग्य झालं, तिचं करिअर झालं म्हणजे तिचं योग्य झालं असं आता राहिलेलं नाही,” असंही तिने सांगितलं.