आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री अशी अमृता सुभाषची ओळख आहे. आज तिचा वाढदिवस आहे. गेली अनेक वर्षे ती नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील ती चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या गोष्टीबाबत खुलासा केला होता. त्या मुलाखतीमध्ये ती आणि तिचा पती अभिनेता संदेश कुलकर्णी यांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय का घेतला, हे तिने सांगितलं होतं.
‘वंडर वुमन’ हा तिचा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना ती दिसली. याच चित्रपटाच्या निमित्ताने ‘आपलं महानगर’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत अमृता सुभाष आणि तिचा नवरा संदेश कुलकर्णी यांनी लग्नानंतर त्यांना मूल न होऊ देण्याचा निर्णय का घेतला यामागचं कारण तिने सांगितलं होतं.
आणखी वाचा : “माकड दिसतोय…,” नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थ जाधवचं चोख उत्तर; म्हणाला…
अमृता म्हणाली होती, “आता काळ बदलत चालला आहे. अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मुलं आवडतात पण त्यांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्यापैकीच एक आम्ही आहोत. मुलं आवडणं आणि ती वाढवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही दोघंही आपापल्या करिअरमध्ये खूप व्यग्र आहोत. त्यामुळे आम्ही बाळाला वेळ देऊ शकू का? आणि त्याला न्याय देऊ शकू का? असा विचार आमच्या मनात आला. त्यामुळेच आम्ही ठरवलं की, आम्हाला बाळ नको.”
पुढे तिने सांगितलं होतं, “आमच्या कामावर आमचं खूप प्रेम असल्यामुळे ते आम्ही सोडू शकत नाही. तसंच कामावरच्या प्रेमामुळे बाळाकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही. आमच्यासारखा विचार करणारे अनेक जण आहेत. परंतु आम्हाला मुलं आवडत नाहीत असा याचा अर्थ होत नाही. आमच्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांवर मी खूप प्रेम करते. मी माझी कामं करून मला वेळ असेल तेव्हा त्यांच्याशी खेळायला जाऊ शकते. मी करिअरकडे ज्या पद्धतीने पाहते त्यात बाळाचं संगोपन मला करता आलं असतं का, असा प्रश्न मला पडतो.”
हेही वाचा : मृणाल कुलकर्णी यांनी खाल्ले होते तळलेले किडे, अनुभव शेअर करत म्हणाल्या, “त्याची चव…”
“आता अनेक जण बदलत्या काळानुसार हा विचार करू लागले आहेत. काळानुसार पूर्णत्वाची व्याख्याही बदलली आहे. त्यामुळे एक बाई तिच्या कामामुळे पूर्ण असू शकते किंवा तिच्या असण्याने ती पूर्ण असू शकते. त्याच्यासाठी तिचं लग्न झालं म्हणजे तिचं योग्य झालं, तिला मूल झालं म्हणजे तिचं योग्य झालं, तिचं करिअर झालं म्हणजे तिचं योग्य झालं असं आता राहिलेलं नाही,” असंही तिने सांगितलं होतं.