आपल्या सहज-सुंदर अभिनयाने कायमच रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणून अमृता सुभाषला ओळखलं जातं. मराठीसह बॉलीवूडमध्येही अमृताने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘लस्ट स्टोरीज’, ‘गल्ली बॉय’, ‘सेक्रेड गेम्स’ यामध्ये तिने साकारलेल्या भूमिका सर्वांच्याच पसंतीस उतरल्या होत्या. पडद्यावर कथानकानुसार अनेकदा इंटिमेट सीन द्यावे लागतात, हे इंटिमेट सीन कसे शूट केले जातात, असे सीन करताना दडपण येतं का? कुटुंबीयांची प्रतिक्रिया आणि सहकलाकारांनी दिलेली साथ याबद्दल अमृता सुभाषने नुकत्याच ‘आरपार’मराठीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तू व्यावसायिक अभिनेत्री आहेस तरीही, एखादा इंटिमेट सीन करताना संकोच वाटत नाही का?” असा प्रश्न अभिनेत्रीला यावेळी विचारण्यात आला. यावर अमृता सुभाष म्हणाली, “खूप….खूप भीती वाटते. पण, आज पुन्हा एकदा मी हेच सांगेन की, ज्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं, त्यांनी नेहमीच माझ्या मनातील भीतीला एक मायेचं कवच दिलं. हे ऐकताना वेगळं वाटेल पण, हेच खरंय… अनेक मुलाखतींमध्ये मी श्रीकांतचं (सहकलाकार ) सुद्धा उदाहरण दिलंय… तो माझ्याबरोबर ‘लस्ट स्टोरीज’मध्ये काम करत होता. त्या सीरिजमध्ये तो इंटिमेट सीन करताना वाट लागायची, तो त्यानंतर माझे पाय देखील दाबून द्यायचा. हे त्या माणसाने माझ्यासाठी केलंय, असा सहकलाकार मिळणं भाग्याचं आहे. कारण, त्या इंटिमेट सीनमध्ये तो कलाकार आणि आपण असे दोघेच असतो. तिथे जे काही घडतं…अनेकदा आपण त्याविषयी बोलतो, काही वेळा बोलूही शकत नाही.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘सेक्रेड गेम्स’मध्ये सुद्धा मी तसा सीन दिला होता. अनुरागच्या सेटवर ज्या पद्धतीची संवेदनशीलता होती ती मी शब्दात सांगू शकत नाही. तरीही मनात एक भीती होतीच. पण, अनुराग कश्यप मला त्या भूमिकेच्या मनापर्यंत घेऊन गेला…त्याने मला भूमिकेचं गांभीर्य समजावून सांगितलं. त्याने मला वचन दिलेलं की, तुला आक्षेपार्ह वाटेल असं काहीच स्क्रीनवर दिसणार नाही.”

नवऱ्याची खंबीर साथ…

इंटिमेट सीन करताना घरचीमंडळी, नातेवाईक यांचंही दडपण असतं याबद्दल सांगताना अमृता सुभाष म्हणाली, “या सगळ्यात मला दिग्दर्शक, सहकलाकार आणि त्यापुढे जाऊन माझ्या घरच्यांकडून खंबीर पाठिंबा मिळाला. आपल्या घरच्यांचा पाठिंबा या सगळ्या प्रक्रियेत खूप मोठा आणि महत्त्वाचा असतो. कारण, खरोखर या गोष्टी व्यावसायिक दृष्टीकोनातूनच होतात. मी पहिल्यांदा चित्रपटात असा सीन करणार होते, तेव्हा माझा नवरा संदेश म्हणाला होता, ‘अमृता ते लाजून केलं ना…अजिबात चांगलं दिसणार नाही. कारण ती एक भावना आहे आणि ती फार सुंदर भावना आहे. त्या स्पेसमध्ये तू स्वत:ला ने…’ तो स्वत: दिग्दर्शक असल्याने त्याने मला अनेक गोष्टींमध्ये मार्गदर्शन केलं.”

नवरा सगळ्यात जवळचा मित्र… – अमृता सुभाष

“सेक्रेड गेम्ससाठी ऑडिशन देताना सुद्धा संदेशने मला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. मी आजवर जेवढ्या ऑडिशन दिल्या, त्याबद्दल घरी चर्चा केलेली आहे. संदेश माझा जोडीदार आहे, माझा सोलमेट आहे. नवऱ्यापलीकडे जाऊन तो माझा सर्वात जवळचा मित्र आहे. इंटिमेट सीन करताना भीती ही वाटलीच…पण, या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे मी ते शकले.” असं अमृता सुभाषने सांगितलं.