सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. शिंदे कुटुंबातील गायकांनी गायलेली गाणी कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी आहेत. शिंदे कुटुंबियांवर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदेने नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक शिंदे याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ३१ जुलै रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. उत्कर्षने सार्थकसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली होती.
आणखी वाचा : “माझ्यासाठी खूप मोठा धक्का…”, कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येवर खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले दु:ख
“तुझ्यासारखा कलाकार होणे नाही. आम्हाला तुझी कायम आठवण येत राहिल”, असे उत्कर्षने या पोस्टमध्ये म्हटले आहे. सार्थकच्या निधनानं शिंदेशाहीतला एक तारा निखळला, अशी भावना चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, सार्थक शिंदे हा दिनकर शिंदे यांचा मुलगा होता. सार्थक हा भीम गीतांच्या कार्यक्रमांसाठी लोकप्रिय होता. तबला आणि ढोलवादक म्हणून तो लोकप्रिय होता. त्याने संपूर्ण महाराष्ट्राभर गाण्याचे कार्यक्रम केले होते.
प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचा गायकीचा वारसा आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांनी जपला. त्यानंतर त्यांची पुढची पिढी म्हणजेच उत्कर्ष, मधुर आणि आघाडीचा गायक आदर्श शिंदे त्यात वैविध्य आणि आधुनिकता आणली.