रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ७०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटातील मुख्य कलाकारांप्रमाणे यामध्ये फ्रेडी पाटील ही विशेष भूमिका साकारलेल्या उपेंद्र लिमयेंचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यामध्ये त्यांनी शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डिलरचं पात्र साकारलं आहे. ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित झाल्यावर या मराठी अभिनेत्याची देशभरात चर्चा होऊ लागली. परंतु, त्याआधी उपेंद्र यांनी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात काम करणार याबद्दल कुठेच सांगितलं नव्हतं. त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट सक्रिय नसल्याने त्यांच्या चाहत्यांना सुद्धा याबद्दल काहीच माहिती नव्हती. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र लिमयेंनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचं कारण सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडिया वापराविषयी सांगताना उपेंद्र लिमये म्हणाले, “अलीकडेच माझ्या मुलांनी केलेल्या आग्रहाखातर मी पुन्हा सोशल मीडियावर सुरू केलं. आपण लोकांना आपल्या चित्रपटांविषयी सांगणार… त्यापेक्षा लोकांनी माझ्या कामामुळे स्वत:हून मला ओळखावं असं मला वाटतं. सोशल मीडिया हे माध्यम आपल्याकडे आलं परंतु, त्याचा वापर कसा करावा? याचं काहीच भान आपल्याला नाहीये. त्यामुळे सकारात्मक गोष्टी घडण्याऐवजी अनेकदा नकारात्मक गोष्टी घडतात.”

हेही वाचा : “सिद्धेशचे आई-बाबा…”, होणाऱ्या सासूबाईंबद्दल पूजा सावंतचा खुलासा; म्हणाली, “त्यांना माझे सिनेमे…”

उपेंद्र लिमये पुढे म्हणाले, “सोशल मीडियावर घडणाऱ्या नकारात्मक गोष्टी पाहिल्यावर आपण त्या वाटेला जाऊयाच नको असं मला नेहमी वाटतं. लोकांना ट्रोल केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सोशल मीडियावर काही लोकांमध्ये किती विकृती असते, त्याला काहीच बंधन नाहीये. अशा विकृत माणसांचा त्रास आपण स्वत:ला का करून घ्यायचा? असं माझं प्रामाणिक मत आहे.”

हेही वाचा : अखेर मायलेकी सायली-प्रतिमा आल्या आमनेसामने! ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो…

“सोशल मीडियामुळे माझ्या आयुष्यात नकारात्मकता येऊ नये म्हणून, मी या माध्यमापासून लांब आहे. मला खरंच ते झेपत नाही. त्या माध्यमाचा वापर कसा करायचा याचे दुर्दैवाने आपल्यावर फारसे बरे संस्कार झालेले नाहीत. असं माझं प्रामाणिक मत आहे.” असं उपेंद्र लिमयेंनी सांगितलं. दरम्यान, २०१४ पासून उपेंद्र लिमये सोशल मीडियावर सक्रिय नाहीत. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांच्या मुलांनी केलेल्या आग्रहामुळे त्यांनी केवळ दोन पोस्ट शेअर केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal fame upendra limaye does not use any social media platform why know the reason sva 00