संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यांत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, शक्ती कपूर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. याशिवाय ‘अॅनिमल’मध्ये तृप्ती डिमरी, उपेंद्र लिमये यांसारखे कलाकार विशेष भूमिकांमध्ये झळकले आहेत. त्यांचा स्क्रीन टाईम कमी असला, तरीही सध्या या दोघांची सर्वाधिक चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मराठी अभिनेते उपेंद्र लिमयेंच्या एन्ट्रीला चित्रपटगृहांमध्ये एक वेगळाच माहोल तयार होत असल्याचं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ‘अॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यांना अनेक मराठी कलाकार व निर्मात्यांचे फोन आल्याचं त्यांनी नुकत्याच लोकमत फिल्मीला एका मुलाखतीत सांगितलं आहे.
हेही वाचा : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’मध्ये ‘झिम्मा’ फेम अभिनेत्री झळकली महत्त्वाच्या भूमिकेत, जाणून घ्या…
उपेंद्र लिमये म्हणाले, “‘अॅनिमल’ पाहिल्यावर मला संदीप पाठकने फोन केला आणि तो तब्बल अर्धा तास माझ्याशी बोलत होता. तो म्हणाला, अरे उप्या तो चित्रपट पाहून मी कुठेतरी मागे पडलोय असं मला वाटलं. संदीपने अत्यंत प्रांजळपणे त्याला एकाप्रकारचं दडपण (कॉम्प्लेक्स) आल्याचं मान्य केलं आणि त्याच्या प्रामाणिकपणाचं मला फारचं कौतुक वाटलं. त्याची प्रतिक्रिया आणि आवर्जून केलेला फोन ही गोष्ट माझ्या कायम लक्षात राहील.”
हेही वाचा : हेमंत ढोमे क्षिती जोगला ‘पाटलीण’ या नावाने का हाक मारतो? खुलासा करत म्हणाला, “लग्नानंतर…”
उपेंद्र लिमये पुढे म्हणाले, “दुसरी एक प्रतिक्रिया मला एका निर्मात्याने दिली होती ती अशी होती की, अरे तुझी लोकप्रियता एवढी असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. कलाकाराच्या अभिनयाने लोक आनंदी होतात हा भाग वेगळा…पण, तुझ्या नुसत्या एन्ट्रीनेच प्रेक्षक वेडे होतात. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी शॉकिंग होत्या असं तो म्हणाला. अशा विविध प्रतिक्रिया मला कलाविश्वातून आल्या.”
“आयुष्यात कधीही नकारात्मक प्रतिक्रियांनी खचून जायचं नसतं आणि चांगल्या सकारात्मक प्रतिक्रियांनी स्वत:ला मोठं समजायचं नसतं. जे कौतुक करतात त्यांचा मी कायम आभारीच आहे.” असं उपेंद्र लिमयेंनी सांगितलं.