अभिनेते उपेंद्र लिमये सध्या संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात त्यांनी फ्रेडी पाटील ही शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डिलरची भूमिका साकारली आहे. उपेंद्र यांनी साकारलेल्या फ्रेडीचा १० ते १५ मिनिटांचा सीन प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहतो. खऱ्या आयुष्यात उपेंद्र लिमयेंचा मुलगा वेद हा रणबीर कपूरचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे आपले बाबा रणबीरबरोबर काम करणार हे समजल्यावर उपेंद्र लिमयेंच्या लेकाने लाडक्या रणबीरसाठी खास निरोप पाठवला होता. याविषयी अभिनेत्याने लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
उपेंद्र लिमये म्हणाले, “जेव्हा माझ्या घरी मी रणबीरबरोबर शूट करणार आहे असं समजलं तेव्हा वेद मला म्हणाला, बाबा प्लीज माझा एक निरोप त्याला दे. त्याला सांग मला तो खरंच खूप आवडतो. एक अभिनेता म्हणून तो मला आवडतोच. पण तो बारसा या फुटबॉल (बार्सिलोना) टीमचा चाहता आहे आणि मलाही ती टीम प्रचंड आवडते. त्यामुळे रणबीर मला खूप जास्त आवडतो असा त्याला निरोप दे. पुढे, सेटवर भेट झाल्यावर मी त्याला वेदचा हा निरोप दिला होता.”
उपेंद्र लिमये पुढे म्हणाले, “वेदला देखील बारसा टीम आवडते हे ऐकून रणबीरला प्रचंड आनंद झाला होता. तुझ्या लेकाला इथे बोलावून घे…मी त्याच्याबरोबर गप्पा मारतो. स्वभावाने रणबीर खरंच खूप चांगला माणूस आहे. वेद तेव्हा नेमका माझा फोन उचलत नव्हता, त्यामुळे त्या दोघांची भेट होऊ शकली नाही. त्याची क्रिकेट मॅच सुरू असल्याने रात्री लेट त्याने मेसेज पाहिले. मॅच संपल्यावर रणबीरला भेटण्यासाठी वेद नॉनस्टॉप फोन करत होता. पण तोपर्यंत आमचं पॅकअप झालेलं होतं.”
हेही वाचा : रणबीर कपूर-कतरिना कैफच्या ब्रेकअपवर आलिया भट्टनं सोडलं मौन, म्हणाली, “मी अनेक ठिकाणी…”
“आजपर्यंत मी अनेक कलाकारांना पाहिलं पण, रणबीर या सगळ्यांपेक्षा प्रचंड वेगळा आहे. इतर कलाकारांचं दुनियेने आमच्याकडे लक्ष द्यावं असं वागणं असतं. पण, रणबीर तुझ्या आजूबाजूला वावरतोय हे तुला कळणार देखील नाही. याबद्दल संदीपने स्वत: त्याचं कौतुक केलं होतं.” असं उपेंद्र लिमयेंनी सांगितलं.