Maharashtra Shaheer Film Review : कृष्णराव गणपतराव साबळे ते महाराष्ट्र शाहीर हा संपूर्ण प्रवास अडीच तासाच्या चित्रपटात मांडणं हे एक शिवधनुष्यच होतं जे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लीलया पेललं आहे. सध्याच्या पिढीला या थोर कलावंताच्या संघर्षगाथेबद्दल माहिती असणं अनिवार्य आहे आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून ते साध्य झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. हा चित्रपट केवळ शाहीर साबळे यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य याबद्दलच भाष्य करत नाही तर एकंदरच महाराष्ट्राला आकार देण्यासाठी ज्या ज्या थोर लोकांचे योगदान लाभले त्यांना हा चित्रपट म्हणजे मानवंदना आहे. चित्रपट जरी शाहीर साबळे यांच्यावर बेतलेला असला तरी तो त्यांच्याबरोबरच या अखंड महाराष्ट्राचा प्रवास आपल्यासमोर उलगडतो अन् ‘महाराष्ट्र शाहीर’ या नावाला योग्य न्यायदेखील देतो.

चित्रपटाचा पूर्वार्ध हा शाहीर साबळे यांचं बालपण, तरुणपण आपल्यासमोर सादर करतो. अर्थात हा पूर्वार्ध काहीसा खेचलेला आणि काही ठिकाणी विनाकारण विनोदी झाल्यासारखा वाटतो खरा पण त्या सीन्सकडे दुर्लक्ष केलं तर काही सीन्स अक्षरशः तुम्हाला चांगलेच लक्षात राहतात आणि मनावर कायमची छाप सोडतात. शाहीर यांची घरची परिस्थिती, त्यांची गाण्याची आवड, वडिलांमुळे लाभलेला गाण्याचा वारसा, चूल आणि मूल या नेहमीच्या जीवनगाड्यात अडकलेली त्यांची आई या सगळ्या गोष्टी फार प्रभावीपणे मांडल्या आहेत. शिवाय साने गुरुजी यांचा शाहीर साबळे यांना लाभलेला सहवास हा अगदी आटोपशीर घेतला आहे. शाहीर यांचं तरुणपण दाखवताना काही ठिकाणी दिग्दर्शकाने घेतलेली लिबर्टी ही थोडीफार खटकते पण ती तेवढ्यापुरतीच. शिवाय भानुमती आणि शाहीर यांच्यातील काही प्रसंग रंगवताना ते थोडे बालिश वाटतात, पण त्यानंतर शाहीर यांचं मुंबईला जाणं, आणि मग साने गुरुजींच्या सानिध्यात आल्यावर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात संगीताच्या माध्यमातून सहभागी होणं हे सगळं अगदी हुबेहूब पडद्यावर मांडलं आहे.

sreeleela doing item song in pushpa 2 movie
श्रद्धा कपूरने नाकारली ‘पुष्पा २’ ची ऑफर, आता ‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
brothers beaten up, Dombivli Kachore,
डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Alleged irregularities in Zopu scheme demands inquiry into Murji Patel along with Akriti developers through petition
झोपु योजनेत अनियमितता केल्याचा आरोप, आकृती डेव्हलपर्ससह मुरजी पटेल यांच्या चौकशीची याचिकेद्वारे मागणी
Rohit Sharma Statement After Being Retained by Mumbai Indians for less than what Jasprit Bumrah and Hardik Pandya got
Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO
call has been made to destroy Ranamodi plant by burning it during Narakasura and Holi festival
वनस्पती रानमोडीचा नरकासूर‌ समजून दहन

आणखी वाचा : Ghar Banduk Biryani Review : गंभीर विषयाची हटके मांडणी, जबरदस्त गाणी अन् दर्जेदार अभिनय; ‘घर बंदूक बिरयानी’ कसा आहे? जाणून घ्या

साने गुरुजी ज्याप्रमाणे म्हणतात की संगीत हा शाहीर यांचा श्वास आहे तसंच या चित्रपटाचा उत्तरार्ध हा त्याचा श्वास आहे आणि या उत्तरार्धात प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात दिग्दर्शकाला यश मिळालं आहे. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध पाहताना खास केदार शिंदे टचची प्रकर्षाने जाणीव होते. शाहीर यांना मिळणारी लोकप्रियता, यामुळे दुरावलेली त्यांची पत्नी भानुमती, त्यानंतर एक शाहीर म्हणून त्यांचा प्रवास, जनजागृतीसाठी त्यांनी केलेलं कार्य, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचं योगदान, वेगवेगळी नाटकं, राजकीय नेत्यांबरोबरचे त्यांचे संबंध ते महाराष्ट्राची लोकधारापर्यंतचा शाहीर साबळे यांचा प्रवास अगदी समर्पकपणे केदार शिंदे यांनी मांडला आहे. जेव्हा भानुमती शाहीर यांना सोडून जातात तेव्हाचा सीनतर अगदी तुमच्या डोळ्यात पाणी आणतो. याबरोबरच शाहीर साबळे आणि तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अन् बाळासाहेब ठाकरे यांच्यातील प्रसंग आणि ‘आंधळं दळतंय’ या नाटकामुळे मुंबईतील बिघडलेले वातावरण हे सगळं आपल्यासमोर फार उत्तमरित्या सादर करण्यात आलं आहे.

अर्थात जर पूर्वार्धात काही गोष्ट टाळल्या असत्या तर या सगळ्या गोष्टी आणखी खुलवून आणि विस्तृतपणे उत्तरार्धात मांडता आल्या असत्या पण असो, त्या गोष्टी तुमच्यावर प्रभाव पडतात हे नक्की. याबरोबरच शाहीर यांनी मोबाइल थिएटर सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ अन् त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्या आणि त्यात होरपळून निघणारं त्यांचं कुटुंब हेदेखील फार प्रभावीरित्या चित्रपटात मांडलं आहे, खासकरून यावेळी अजय गोगवले यांच्या आवाजातील ‘पाऊल थकलं नाही’ हे गाणं पाहताना अंगवार काटा नक्की येईल. खरंतर संगीत हा या चित्रपटाचा आत्मा आहे अन् ती धुरा अजय-अतुल यांच्या खांद्यावर आहे आणि त्यांनी यातील गाण्यांना योग्य तो न्याय दिला आहे. काही गाणी पुन्हा रिक्रिएट करण्यात आली असून काही नवीन गाणीही यात आहेत आणि त्यातलं नावीन्य हे आपल्याला खूप भावतं. खूप दिवसांनी अजय-अतुल या जोडीकडून काहीतरी फ्रेश ऐकायला मिळालं याचा आनंद आहे.

याबरोबरच वासुदेव राणे यांची सिनेमॅटोग्राफीने वेगळीच जान आणली आहे. वसुंधरा साबळे, ओंकार दत्त आणि प्रतिमा कुलकर्णी यांची पटकथा आणि संवाद लाजवाबच. आधी म्हंटल्याप्रमाणे पूर्वार्धातील काही सीन्स सोडले तर पटकथा अगदी उत्तम बांधली आहे. अभिनयाचा बाबतीतही सगळ्यांनीच चोख कामं केली आहेत. सना शिंदे हीची अदाकारी तेवढी छाप पाडत नाही, अर्थात अजून बराच पल्ला गाठायचा आहे तिला, पण इतर सगळ्यांची कामं अप्रतिम झाली आहेत. अंकुश चौधरी हा हुबेहूब शाहीर साबळे यांच्यासारखा पडद्यावर दिसत जरी नसला तरी त्याने शाहीर यांचा सुर मात्र अचूक पकडला आहे अन् त्यामुळेच त्याच्या मेकअपकडे १० मिनिटांनंतर लक्षही जात नाही ही खरी दिग्दर्शक आणि अभिनेत्याची कमाल. कधीकधी हुबेहूब दिसण्यापेक्षा ते पात्रं योग्यरित्या सादर करणं महत्त्वाचं असतं जे अंकुश चौधरीने करून दाखवलं आहे. खासकरून चित्रपटाच्या शेवटी शाहीर जेव्हा फ्लॅशबॅकमध्ये हा प्रवास उलगाडताना कॅमेरात बघून प्रेक्षकांशी संवाद साधतात तो सीन आणि त्यानंतर येणारं महाराष्ट्र गीत पाहून एक प्रेक्षक म्हणून तुम्ही संतुष्ट होता. अर्थात या गाण्यातही एक सरप्राइज आहे आणि त्यासाठी तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा. बायोपिक जरी असला तरी कथा, पटकथेच्या बाबतीत कुठेही तडजोड न करता एक उत्तम कलाकृती केदार शिंदे यांनी सादर केली आहे, महाराष्ट्रातील प्रत्येकाने एकदा तरी चित्रपट जरूर बघायलाच हवा.