मराठी कलाविश्वाचा सुपरस्टार म्हणून अंकुश चौधरीला ओळखलं जातं. आजवर त्याने ‘दुनियादारी’, ‘दगडी चाळ’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘गुरु’, ‘क्लासमेट्स’ अशा असंख्य लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सुरुवातीच्या काळात प्रचंड मेहनतीच्या जोरावर अंकुशने कलाविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या अभिनेता स्टार प्रवाहच्या ‘सुपरस्टार जोडी नंबर १’ या शोमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. या शोच्या निमित्ताने अंकुशने नुकतीच रेडिओ एफएमच्या मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.
आईविषयी सांगताना अंकुश चौधरी म्हणाला, “मला पहिल्यापासून माझ्या आईने खूप जास्त सांभाळून घेतलं. आजपर्यंत मी कोणत्याही प्रकारची शिवी दिलेली नाही. याचं सगळ्यात मोठं कारण माझी आई आहे. तिने मला या सगळ्या गोष्टी शिकवल्या, उत्तम संस्कार दिले.”
हेही वाचा : Video : “अतिशय घृणास्पद, लाजिरवाणा प्रकार”, खासगी कारचालकावर ‘वादळवाट’ फेम अदिती सारंगधर संतापली, म्हणाली…
अंकुश पुढे म्हणाला, “एकदा लहान असताना सगळी मुलं म्हणतात म्हणून मी सुद्धा एका दारू प्यायलेल्या माणसाला बेवXX म्हणू लागलो. त्यावरून घरी आल्यावर माझ्या आईने मला मारलं होतं. हा वाईट, अपशब्द आहे. कोणालाही अशा पद्धतीने कधीच हाक मारायची नाही असं तिने मला सांगितलं. त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधीच पुन्हा शिवी दिली नाही.”
“माझ्याकडे आलेल्या पहिल्या व्यावसायिक नाटकात शिवी होती म्हणून ते नाटक मी सोडलं होतं. महेश मांजरेकरांचा चित्रपट लालबाग परळमध्ये सुद्धा शिव्या होत्या. त्यामुळे मी त्यांना विनंती केली होती की, हा चित्रपट मी नाही करू शकणार…मला माहितीये तुम्ही सुद्धा मला काढाल कारण यात शिव्या आहेत आणि त्या देणं गरजेचं आहे. चित्रपटाचं कथानकच तसं होतं. यावर ते म्हणाले होते, ‘तू नको देऊस शिवी मी सांभाळून घेतो’ याशिवाय ‘दुनियादारी’मध्ये सुद्धा शिव्या आहेत. पण, त्या सगळ्या शिव्यांना एक पर्यायी शब्द दिलाय आणि त्याला हेल शिव्यांचा दिलाय. त्यामुळे मला याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईला द्यायचंय तिने मला खूप काही शिकवलं.” असं अंकुश चौधरीने सांगितलं.