नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच अंकुश चौधरी. अंकुशला मराठी कलाविश्वातील सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘दुनियादारी’, ‘दगळी चाळ’, ‘क्लासमेट’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरु’, ‘ट्रिपल सीट’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करून अंकुशने आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे.
आता लवकरच अभिनेता एका नव्या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, या नाटकाची घोषणा करताना अंकुशने एक विशेष पोस्ट फेसबुकवर शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या मूळच्या मुंबईकरांचं अस्तित्व शहरातून कसं हद्दपार होतंय यावर हे नाटक भाष्य करेल. याबाबत अंकुश काय म्हणतोय जाणून घेऊयात…
अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत
नमस्कार,
मी अंकुश चौधरी. गेली पन्नास वर्षे मी या मुंबई शहरात राहतोय. या शहराचा वेग आणि त्याच वेगाने बदलणारं हे शहर मी रोज पाहत आहे. याच शहरातल्या गिरणगावात मी लहानाचा मोठा झालो. कॉलेज, नाटक, कट्टा, उत्सव, मॅटर, कॉटर, दोस्ती, यारी, थोडक्यात सांगायचं तर याच गिरणगावात माझी सगळी दुनियादारी.सांगायची गोष्ट ही की, हे शहर बदलतंय आणि यावेळेस फक्त शहर नाही तर सर्वांना सामावून घेण्याची या शहराची मूळ वृत्तीच बदलत आहे. कधी काळी या शहरावर राज्य करणाऱ्या मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललेलं आहे. ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून हे शहर उभं केलं, त्या कामगारांचं अस्तित्वच हे शहर नाकारू लागलंय. या साऱ्याची जाणीव आणि जाणिवेतून येणारी अस्वस्थता माझ्यासारख्या अनेक भूमिपुत्रांच्या वाट्याला येत असेलच.
एक कलाकार म्हणून ही अस्वस्थता लोकांपर्यत पोहोचावी म्हणून या शहराची, शहरातील गिरणगावाची आणि या गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार ‘तोडी मिल फॅन्टसी’ हे नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे. २२ जून रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह. सायंकाळी ४:०० वा. राणीबाग भायखळा येथे. या आपल्या शहराची, आपल्या गिरणगावाची गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझी खात्री आहे माझ्या या प्रयत्नात तुम्ही मला नक्की साथ द्याल.
तुमचा मित्र आणि गिरणगावचा भूमिपुत्र
अंकुश चौधरी
दरम्यान, अंकुशच्या ‘तोडी मिल फॅन्टसी’ या नव्या नाटकासाठी नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेतच पण, जवळपास सगळ्याच युजर्सनी अभिनेत्याच्या पोस्टशी सहमती दर्शवत आपलं मत मांडलं आहे. “संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाचे अस्तिव नाहीसे होत चालले आहे”, “मराठी माणूस डायनासोरसारखा लुप्त होतोय मुंबईमधून. मोठ्या अभिमानाने मराठी माणूस कल्याण डोंबिवली, विरार, ठाणे या शहरांमध्ये जाऊन राहतोय”, “खूप खूप शुभेच्छा अंकुश दादा तुझ्या प्रयत्नांना यश येऊदे” अशा प्रतिक्रिया कमेंट्समध्ये अंकुशच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.