अनुजा साठे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेक नाटकं, मालिका, चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत लोकप्रियता मिळवल्यावर तिने हिंदी कला विश्वामध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु एखाद्या राजकीय किंवा सामाजिक विषयावर तिचं मत ती कधी मांडताना दिसत नाही. आता याबाबत तिने मोकळेपणाने भाष्य केलं आहे.
राजकीय क्षेत्रात मनोरंजन क्षेत्रात अनेक घडामोडी घडत असतात. त्यावर लोक सोशल मीडियावरून त्यांचं मत मांडताना दिसतात. मात्र मराठी कलाकार कधीही या गोष्टींबद्दल त्यांचं काय मत आहे, हे स्पष्टपणे सांगताना दिसत नाहीत. मराठी कलाकार व्यक्त का होत नाहीत, हे अनुजाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
आणखी वाचा : Video: अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणण्याची सुरुवात कुठून झाली? स्वतः खुलासा करत म्हणाले होते…
अनुजा म्हणाली, “एक नागरिक म्हणून जे घडतं त्याची दखल आपण घेतलीच पाहिजे आणि कलाकार म्हणून व्यक्त होण्याची जबाबदारीही समजून घेतली पाहिजे. पण अनेकदा त्यावरून कलाकारांना पारखलं जातं आणि त्यांना पातळी सोडून ट्रोल केलं जातं. आम्ही पब्लिक फिगर असतो म्हणून लोक वाट्टेल ते बोलतात. यामुळेच आपली मतं आपल्याकडे ठेवून गप्प बसावं ही भूमिका कलाकार घेताना दिसतात आणि तेच मलाही योग्य वाटतं. त्यामुळे राजकारण, जात, धर्म यांबद्दल बोलण्याच्या ऐवजी मला समाजातील इतर समस्या, पाळीव प्राणी, वन्यजीवन याबद्दल व्यक्त व्हायला मला आवडेल.”
हेही वाचा : ‘अश्रफ भाटकरची भूमिका साकारणं म्हणजे…’; अभिनेत्रीने शेअर केला अनुभव
दरम्यान, अनुजा लवकरच ‘फकाट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्या जोडीला हेमंत ढोमे दिसणार आहे. हा तिचा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित होईल.