सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मराठीसह हिंदी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी स्वत:चे जीवन संपवले. चित्रपटसृष्टीत नितीन देसाई उत्तम अभिनेते आणि निर्माते म्हणूनही ओळखले जायचे. यासंदर्भात आता खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केले आहे.
हेही वाचा : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. आम्ही दोघांनी अनेक वर्ष एकत्र काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली मालिका पूर्ण करण्याचे शिवधनुष्य दादांनी यशस्वीपणे सांभाळले होते. त्यांनी मला आणि संपूर्ण मराठी कलाविश्वाला खूप काही शिकवले आहे. केवळ मराठीतच नव्हे तर बॉलीवूडमध्येही त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. एनडी स्टुडिओसारखे भव्य स्वप्न पाहणे आजकालच्या कोणत्याही माणसाला शक्य झाले नसते. पण, त्यांनी ते करून दाखवले.”
हेही वाचा : ‘मिट्टीसे जुडे हैं..’, ही ठरली कला दिग्दर्शक नितीन देसाईंची शेवटची फेसबुक पोस्ट
“दादांबरोबर मी जवळपास सहा ते सात वर्ष एकत्र काम केले. परंतु गेल्या चार वर्षांत आमचा फारसा संपर्क आला नव्हता. फक्त आमचे फोनवर बोलणे झाले होते. दादांच्याबाबत अशी बातमी ऐकायला मिळतेय यावर अजून विश्वास बसत नाही.” असे सांगत खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दोघांनीही ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेच्यावेळी एकत्र काम केले होते.
हेही वाचा : पाचव्या दिवशीही ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची यशस्वी घोडदौड सुरूच; लवकरच पार करणार कमाईचा ‘हा’ टप्पा
दरम्यान, नितीन देसाई यांनी बॉलीवूडमधील ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या गाजलेल्या चित्रपटांचे कलादिग्दर्शन केले होते. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असे सांगितले जात आहे.