Asha Bhosle On Film Industry : भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेल्या दिग्गज गायिका म्हणून आशा भोसले यांना ओळखलं जातं. त्यांच्या सुमधूर आवाजाची जादू कायमच श्रोत्यांना भुरळ घालते. रसिकांना त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई ऑफस्क्रीन चविष्ट जेवण बनवतात. दुबईमध्ये त्यांचं अनेक वर्षांपासून Asha’s रेस्टॉरंट नावाचं हॉटेल देखील आहे. अनेकदा आशा भोसले या हॉटेलच्या किचनमध्ये दम बिर्याणीसारखे विविध पदार्थ बनवत असतात. नुकतीच त्यांनी कर्ली टेल्स या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना जेवणाच्या आवडीनिवडीशिवाय सिनेविश्वातील अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं.
“तुमच्या कोणी मैत्रिणी आहेत का?” असा प्रश्न आशा भोसले यांना विचारण्यात आला. यावर ज्येष्ठ गायिका म्हणाल्या, “माझ्या मैत्रिणी आहेत पण, त्या पुण्यात राहतात त्यांचा इंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही. मला इंडस्ट्रीत मैत्रिणी बनवण्याची कधी संधीच मिळाली नाही. कारण, जास्तीत जास्त वेळ कामातच जायचा.”
हेही वाचा : “तोंडाचे आचरट हावभाव…”, म्हणणाऱ्या नेटकऱ्यावर ऐश्वर्या नारकरांचा संताप! स्पष्ट उत्तर देत म्हणाल्या…
आशा भोसले ( Asha Bhosle ) यांच्या इंडस्ट्रीत आहेत फक्त दोन मैत्रिणी
आशा भोसले पुढे म्हणाल्या, “माझा सर्वाधिक वेळ कामात जायचा आणि तिथे माझ्या मैत्रिणी झाल्या नाहीत. फिल्म क्षेत्रातल्या महिला एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत. त्या एकमेकींवर जळतात त्यामुळे फिल्मी क्षेत्रात मैत्रिणी कशा बनवणार… पण, या सगळ्यात पूनम ढिल्लों माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. याशिवाय पद्मिनी कोल्हापूरे माझ्या जवळची आहे ती माझी भाची लागते. फिल्म क्षेत्रात या दोनच मैत्रिणी आहेत आणि या दोघी माझ्याबरोबर सगळीकडे असतात.”
“मी कधी पार्टी सुद्धा केली नाही. फक्त राज कपूर यांच्या १० – १२ पार्ट्यांना मी उपस्थित होते. त्यांच्या पार्ट्या मुंबईत सगळ्यात भव्य असायच्या.” असं आशा भोसले यांनी सांगितलं.
हेही वाचा : मुंबईच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन यंदा गणपतीपुळेचा प्रवास कोकण रेल्वेने होणार; ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट ‘या’ तारखेला भेटीला येणार
दरम्यान, दुबई, कुवेत, अबू धाबी, दोहा, बहरेन अशा विविध ठिकाणी आशा भोसले ( Asha Bhosle ) यांची हॉटेल्स आहेत. त्यांनी गेल्या २० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रेस्टॉरंटची साखळी उघडली आहे.