Ashi Hi Banwa Banwi Fame Actors Dance Together : ‘अशी ही बनवा बनवी’ हा मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन चित्रपट म्हणून ओळखला जातो. २३ सप्टेंबर १९८८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘अशी ही बनवा बनवी’मध्ये सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, सिद्धार्थ रे, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तर, यांच्या जोडीला प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ, अश्विनी भावे आणि सुप्रिया पिळगांवकरांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘अशी ही बनवा बनवी’ने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली होती. या सदाबहार चित्रपटाच्या आठवणी आता पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
अमेरिकेत पार पडलेल्या ‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हलला सचिन, सुप्रिया, निवेदिता सराफ, अश्विनी भावे असे ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. हे ज्येष्ठ कलाकार मंचावर एकत्र येताच सर्वांच्या मनात या एव्हरग्रीन चित्रपटादरम्यानच्या आठवणी ताज्या झाल्या. या चौघांनी मिळून यामधल्या डोहाळे जेवणाच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “फॉरेनची पाटलीण मस्तच…”, रांगडा गडी पडलाय परदेसी गर्लच्या प्रेमात? पाहा नवीन प्रोमो…
‘अशी ही बनवा बनवी’मधील कलाकारांचा एकत्र डान्स
सचिन – सुप्रिया, निवेदिता सराफ आणि अश्विनी भावे हे चौघेजण ‘कुणीतरी येणार येणार गं’ या गाण्यावर एकत्र थिरकले. मूळ चित्रपटाच्या कथेनुसार या डोहाळे जेवणाच्या गाण्यावर सचिन पिळगांवकर यांनी स्त्रीरुपातील भूमिकेत जबरदस्त डान्स केला होता. त्यामुळे या चौघांना पुन्हा एकत्र पाहून सगळ्यांनाच ‘अशी ही बनवा बनवी’ ( Ashi Hi Banwa Banwi ) हा चित्रपट आठवला.
सचिन यांनी ‘कुणीतरी येणार येणार गं’ गाण्यावर ठेका धरताच सभागृहात एकच जल्लोष झाल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी देखील या कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मराठी सेलिब्रिटी कट्टा या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, सचिन पिळगांवकरांबद्दल सांगायचं झालं, तर त्यांचा ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ या दोन सुपरस्टार अभिनेत्यांची जोडी आपल्याला पुन्हा एकदा ऑनस्क्रीनवर एकत्र पाहायला मिळणार आहे. तर, “लक्ष्मीकांत बेर्डे आता आपल्यात नसल्याने ‘अशी ही बनवाबनवी’चा ( Ashi Hi Banwa Banwi ) दुसरा भाग बनवणार नाही” असं देखील सचिन पिळगांवकरांनी स्पष्ट केलं आहे.