“जीवनात ही घडी अशीच राहू दे…”, बघता बघता दहा-वीस नव्हे तर ३५ वर्षे पूर्ण झाली. वयात १८ वर्षांचं अंतर, नाटकाच्या प्रयोगादरम्यान पहिली भेट, चित्रपटात भाऊ-बहीण म्हणून केलेलं काम ते पडद्यामागच्या खऱ्या आयुष्यात साता जन्माचे जोडीदार! अशीच आहे निवेदिता व अशोक सराफ यांची सदाबहार प्रेमकहाणी…! घरातून विरोध, वयात अंतर, दोघांच्या प्रेमाला जवळच्या मित्राने दिलेली खंबीर साथ असे सगळे चढउतार या दोघांनी एकत्र पाहिले. पण, शेवटी ‘मामला पोरींचा’ या चित्रपटाच्या सेटवर जुळलेले यांच्या मनाचे बंध पुढे जाऊन लग्नाच्या रेशीमगाठीत अडकले.
यंदाचं २०२४ हे वर्ष या दोघांसाठी सर्वार्थाने खास ठरलं. याचं कारण म्हणजे, कलाविश्वातील या हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेत्याला ‘महाराष्ट्र भूषण’, ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ व मराठी नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हे सगळे पुरस्कार स्वीकारताना अशोक सराफ यांनी त्यांच्या प्रत्येक भाषणात आवर्जून निवेदिता यांचा उल्लेख केला. ‘तिची’ साथ ‘त्यांच्या’ आयुष्यात किती महत्त्वाची होती हे त्यांनी प्रकर्षाने अधोरेखित केलं. एकीकडे अशोक सराफ यांची नाळ कलेशी जोडलेली असताना दुसरीकडे, संसाराची व घराची जबाबदारी निवेदिता यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली. याच त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाला आज ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने आपण अशोक व निवेदिता यांची एव्हरग्रीन लव्हस्टोरी जाणून घेऊयात…
हेही वाचा : प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
पहिली भेट
निवेदिता यांचे वडील ‘डार्लिंग – डार्लिंग’ या नाटकात काम करायचे याच ठिकाणी या दोघांची पहिली भेट झाली. या जोडप्याच्या वयात बरंच अंतर असल्याने निवेदिता जेव्हा शाळेत होत्या तेव्हाची ही गोष्ट…
अशोक सराफ आणि निवेदिता यांचे वडील गजानन जोशी एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. एके दिवशी नेमकी छोट्या निवेदिताला शाळेला सुट्टी होती अन् गजानन जोशी तिला नाटकाच्या प्रयोगासाठी घेऊन गेले होते. याबद्दल अशोक सराफ सांगतात, “त्यावेळी हिच्या वडिलांनी मला ‘ए अशोक’ असा आवाज दिला. मी मागे वळून पाहिल्यावर तो म्हणाला ही माझी मुलगी. तेव्हा ही लहान होती. एवढीशी एक मुलगी त्याचा हात धरून उभी होती. मला तेव्हा वाटलंच नव्हतं की, पुढे गोष्टी अशाप्रकारे घडून येतील.” त्यानंतर पुढे बऱ्याच वर्षांनी ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटाच्या सेटवर अशोक व निवेदिता यांची फक्त भेट झाली. या दोघांचा या चित्रपटामध्ये एकत्र एकही सीन नव्हता. त्यामुळे शेवटच्या क्लायमॅक्स सीनचं शूट चालू असताना हे दोघं फक्त एकमेकांना भेटले होते. पण, गंमत अशी की, या चित्रपटात अशोक व निवेदिता यांनी एकमेकांच्या भावा-बहिणीची भूमिका साकारली होती. “त्यावेळी मी लांबून फक्त पाहिलं ही ‘गजन’ची मुलगी आहे. चेहरा तसाच दिसतोय… मी हिच्या वडिलांना ‘गजन’ म्हणून हाक मारायचो” असं अशोक सराफ यांनी सुप्रिया-सचिन यांच्या ‘जोडी तुझी माझी’ या शोमध्ये सांगितलं होतं.
…अन् निवेदिता प्रेमात पडल्या
‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटानंतर अशोक-निवेदिता यांनी ‘तू सौभाग्यवती हो’मध्ये काम केलं. पण, त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुद्धा या दोघांचं एकमेकांशी बोलणं झालं नव्हतं. यानंतर पडद्यावर आला ‘धुमधडाका’. याबद्दल निवेदिता सराफ सांगतात, “माझा सेटवर पहिलाच सीन अशोकबरोबर होता आणि त्यावेळी त्या सीनमध्ये हा मला म्हणाला, “तुला मनासारखा नवरा मिळू देत” आणि त्यानंतर पुन्हा त्या चित्रपटामध्ये आम्ही एकही शब्द बोललो नाही. पण, त्यावेळी मला त्याने गाडी चालवायला शिकवली होती. पुढे, आम्ही ‘मामला पोरींचा’ हा सिनेमा केला आणि तिकडेच आमचा हा मामला जमला. त्या सिनेमाच्या शूटिंगला येताना अशोकचा मोठा अपघात झाला होता. त्यातून त्याचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झाला. त्यावेळी पहिल्यांदा मी त्याच्या घरी त्याला भेटायला गेले होते. त्यानंतर तो बरा होऊन सेटवर आला…त्याचे ते प्रयत्न, मेहनत, कलाकार म्हणून प्रचंड जिद्द हे सगळं मी डोळ्यासमोर पाहिलं आणि ते सगळं पाहून मी त्याच्या खरंच प्रेमात पडले आणि मनात ठरवलं होतं… लग्न केलं तर अशोकशीच करेन नाहीतर करणारच नाही.”
अशोक आणि निवेदिताच्या लव्हस्टोरीमध्ये अभिनेत्रीला सर्वाधिक मदत सचिन पिळगांवकरांनी केली होती. ‘अशी ही बनवाबनवी’च्या सेटवर त्यांचं प्रेम खऱ्या अर्थाने फुललं. निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्यासमोर सर्वप्रथम आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. डेटिंग-अफेअर याच्यापुढे जाऊन लग्न करायचं हे त्यांनी ठामपणे ठरवलं होतं. आता एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर या जोडप्याचं लग्न कसं जुळलं पाहुयात…
दोघांचं लग्न कसं जुळलं?
अशोक व निवेदिता यांचं लग्न गोव्यात पार पडलं. दोघांच्या वयात जवळपास १८ वर्षांचं अंतर होतं. अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता या अवघ्या ६ वर्षांच्या होत्या. हे अंतर पाहता अभिनेत्रीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. चित्रपट क्षेत्रातील कोणत्याही मुलाशी निवेदिताने लग्न करू नये अशी तिच्या आईची इच्छा होती. पण, निवेदिता खूपच ठाम होत्या. यावेळी निवेदिताला मोठ्या बहिणीने म्हणजेच डॉ. मीनल परांजपे यांनी मदत केली होती. त्यांनी कुटुंबीयांचं मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
लग्नाच्या दोन दिवस आधीपर्यंत निवेदिता यांनी त्यांच्या आईला लग्नाबद्दल काहीच माहिती दिली नव्हती. गोव्यात मंगेशीच्या देवळात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. अशोक सराफ यांच्या आईची या जोडप्याचं मंगेशीच्या देवळात लग्न व्हावं अशी खूप इच्छा होती. या दोघांच्या लग्नाचा साग्रसंगीत सोहळा पार पडला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवेदिता यांचा भाऊ म्हणून सचिन पिळगांवकर यांनी अशोक सराफ यांचा कान पिळला होता. “नावा-नावाची काय बिशाद, अशोक माझ्या खिशात” हा उखाणा निवेदिता यांनी त्यांच्या लग्नात घेतला होता.
हेही वाचा : आलिया भट्ट : नेपोटिझमचा ठपका पुसून ट्रोलर्सना हसतमुखाने सामोरी जाणारी बहुरंगी अभिनेत्री
लग्नानंतर काही वर्षांनी निवेदिता यांनी कलाविश्वातून ब्रेक घेतला. आपला एकुलता एक मुलगा अनिकेत याचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी घरी राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही आई-वडील शूटिंगसाठी बाहेर असल्यावर मुलाकडे कोण लक्ष देणार याची काळजी अभिनेत्रीला होती. त्यामुळेच अनिकेतच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी निवेदिता यांनी गृहिणी म्हणून आयुष्याची नवीन इनिंग सुरु केली असं जरी असलं, तरीही अशोक सराफ यांना त्यांनी पदोपदी साथ दिली आहे. कलाविश्वापासून १४ वर्षे दूर राहणं हा सर्वस्वी निवेदिता यांचा निर्णय होता. मुलगा मोठा झाल्यावर आता पुन्हा एकदा निवेदिता सराफ छोट्या पडद्यावर सक्रिय झाल्या आहेत.
निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या सहजीवनाला आज ३५ वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. परंतु, या सगळ्या शुभेच्छांमध्ये एक संदेश सारखाच आहे तो म्हणजे ‘जोडी असावी तर अशी’…. चित्रपटाच्या सेटवर जुळलेली ही जोडी सात जन्म अशीच राहावी हिच सदिच्छा!