Ashok Samarth : ‘सिंघम’, ‘रावरंभा’, ‘बेधडक’, ‘बलोच’, ‘सत्या-२’ यांसारख्या चित्रपटांमधून महत्त्वाच्या भूमिका साकारत हिंदीसह मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे अशोक समर्थ. हिंदी, मराठी इंडस्ट्रीसह त्यांचा दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही काम करण्याचा अनुभव आहे. मात्र त्यांचा हा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मोठा संघर्ष करत त्यांनी या इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं आहे. त्यामुळे मराठी, हिंदी तसंच दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत.
मराठी इंडस्ट्रीत कौतुकाचा तुटवडा असल्याचं अशोक समर्थ यांचं वक्तव्य
अशोक समर्थ यांनी याच आपल्या अनुभवांबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अशोक समर्थ यांनी मराठी इंडस्ट्रीत कौतुक करण्याबद्दल तुटवडा असल्याचं म्हटलं आहे. याबद्दल ते असं म्हणाले की, “दुर्दैवाने आपल्या इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्रीच्या बाबतीत म्हणतो की, कौतुक नावाची ही प्रक्रिया असते. याचा फार तुटवडा आहे, खरंतर कुणीच कुणाच्या नशीबातलं काम घेत नाही. कोणी कुणाऐवजी बदलीचं काम करत नाही. बदलीचं काम म्हणजे मी अशा अर्थाने म्हणतो की, मी तुमचं काही हिरावून घेऊ शकत नाही आणि माझंही तुम्ही काही हिरावून घेऊ शकत नाही.”
“ज्याचा प्रभाव पडतो, त्याचं कौतुक करण्याचा आपल्याकडे तुटवडा”
यापुढे ते म्हणाले की, “आपल्यावर ज्याचा प्रभाव पडतो. त्याचं कौतुक करणं याचा आपल्याकडे तुटवडा आहे. फक्त भीती एकाच गोष्टीची वाटायची मला की, मधल्या काळात एका टप्प्यापर्यंत की, दुनियेतल्या कोणत्याही क्षेत्रातल्या माणसांनी लोकांबरोबर इतक्या थराला जाऊन वागू नये की, एखाद्या माणसाच्या मनात स्वत:ला संपवण्याचा विचार यावा. कारण सगळेच अशोक समर्थ नाहीत किंवा नसतील.”
“खूप परिश्रमामधून तुमचं मन कटू होतं”
यानंतर अशोक समर्थ यांनी असं म्हटलं की, “खूप परिश्रमामधून तुमचं मन कटू होतं. बऱ्याचदा दुर्दैवाने आताच्या पिढीला ते सकस अन्न मिळत नाहीय असं मी म्हणेन. कारण ज्याच्यामुळे त्यांच्या मेंदूची तितक्या ताकदीने वाढ होऊ शकत नाही. आज किती आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे.” दरम्यान, अशोक समर्थ यांनी या क्षेत्रात येण्यासाठी खूप संघर्ष केल्याचेही या मुलाखतीत म्हटलं आहे.
“फूटपाथ हे माझं झोपण्याचं ठिकण होतं”
याबद्दल अशोक समर्थ म्हणाले की, “आयुष्यातली माझी पहिली नोकरी वेटरची होती. मला ६०० रुपये मिळायचे. त्यानंतर मी पहिल्यांदा एका कॉट बेसिस रूममध्ये राहिलो. मधल्या काळात मी संभाजी पार्क, सारसबाग, रेल्वे स्टेशनवर झोपलो. फूटपाथ हे माझं झोपण्याचं ठिकण होतं.”