रंगभूमीचा चंदेरी रंगमंच असो वा चित्रपटाचा सोनेरी पडदा असो… आपल्या बहारदार व चिरतरुण अभिनयाने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनयसम्राट म्हणजे महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf). अशोक सराफ यांनी आजवर आपल्या अनेक विनोदी, तसेच गंभीर भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांना आपल्या काम आणि अभिनयातून कायम नावीन्याची भेट देणारे अशोक सराफ त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘अशी ही जमवा जमवी’ (Ashi Hi Jamva Jamvi) चित्रपटाची काही दिवसांपासून सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू आहे. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन मुख्य कलाकारांसह अनेक कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर समोर आला होता आणि तेव्हापासून चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटाच्या या ट्रेलरमधून अशोक सराफ व वंदना गुप्ते यांचा एक वेगळा आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. थोडी खट्याळ, थोडी गोंडस व थोडी हळवी अशी या चित्रपटाची कथा आहे. आजच्या तरुणाईबरोबरच प्रौढांनाही भावणारा आणि नवीन विचार मांडणारा हा चित्रपट असल्याचे ट्रेलरवरून दिसत आहे. अशोक सराफ व वंदना गुप्ते यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील खास मजा-मस्तीही या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

राजकमल एंटरटेन्मेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित व दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटातून फक्त तरुणांचीच नाही, तर वृद्ध मित्र-मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटात अशोक सराफ, वंदना गुप्ते यांच्यासह चैत्राली गुप्ते, सुनील बर्वे, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, तसेच नवोदित कलाकार तनिष्का विशे, ओमकार कुलकर्णी आदी कलाकार दिसणार आहेत.

दरम्यान, ‘कधी खट्याळ, कधी हृदयस्पर्शी, तर कधी मनसोक्त हसवणारी ‘अशी ही जमवा जमवी’ असे म्हणत ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. येत्या १० एप्रिलपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या चित्रपटातील अशोक सराफ यांची हटके भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का?, तसेच वंदना गुप्ते व अशोक सराफ यांची जोडी काय कमाल करणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.