Ashok Saraf : महाराष्ट्रभूषण अशोक सराफ सध्या त्यांच्या ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून वंदना गुप्ते आणि अशोक सराफ यांची सदाबहार जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आज वयाची पंचाहत्तरी ओलांडून सुद्धा अशोक सराफ टेलिव्हिजन, चित्रपट अशा सगळ्या माध्यमांमध्ये काम करत आहेत. त्यांचा फिटनेस आजच्या तरुणाईला लाजवेल असाच आहे. फिटनेसबाबत ते नेमकं काय म्हणाले आहेत पाहुयात…
अशोक सराफ यांनी नुकतीच ‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा’ला उपस्थित लावली होती. यावेळी त्यांना फिटनेसबाबत प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल सांगताना अशोक सराफ म्हणाले, “तुम्ही जे काम करताय त्याच्या तुम्ही जवळ राहिलात ना…तर तो फिटनेस तुमच्यात आपोआप येतो. एकंदर काय तर तुमचं तुमच्य कामावर खरंच प्रेम असेल तर फिटनेससाठी वेगळं काहीच करायची गरज नसते.” यानंतर अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ नाटकाचा किस्सा सांगितला.
अशोक सराफ म्हणाले, “व्हॅक्युम क्लिनर नाटकात मी काम करत होतो. त्यावेळी या नाटकाचा रत्नागिरीत दौरा होता. दुपारी, प्रयोग सुरू होण्याआधी मी रत्नागिरीत सुके मासे खारवलेले मासे खाल्ले. मासे मला प्रचंड आवडतात, तो माझा वीक पॉइंट आहे. त्यात ते सुके मासे मी दुपारी खाल्ले आणि काय झालं कुणास ठाऊक…नाटकाचा पहिला अंक संपत असताना मला थोडी गरगरी आली.”
अभिनेते पुढे म्हणाले, “पहिला अंक संपणार तेव्हा मला कळून चुकलं की, मला चक्कर येतेय. त्यानंतर त्या नाटकाचा दुसरा अंक मी पूर्ण त्याच परिस्थितीत केला. पण, कुणालाही ही गोष्ट समजली नाही. प्रयोग संपल्यावर मी ताबडतोब डॉक्टरांना बोलावून घेतलं होतं. आम्ही तिकडच्या एका रुग्णालयात गेलो. तिथे माझं चेकअप झालं आणि माझं ब्लड प्रेशर खूप जास्त वाढलं होतं. त्यावेळी माझं ब्लड प्रेशर साधारण २०० च्या आसपास गेलं होतं. मला डॉक्टर विचारतात, ‘तू रंगमंचावर कसं काय काम केलं’…म्हटलं, प्रयोग केला कारण… एकदा रंगमंचावर गेल्यावर मी प्रेक्षकांचा असतो.”
“त्या दिवसापासून मी सुके मासे खाणं बंद केलं. कारण, ते सुके मासे खारवलेले असतात. त्यात मीठाचं प्रमाण सर्वात जास्त असतं. मला खाताना काहीच वाटलं नाही. पण, नंतर हे वाढलेलं ब्लड प्रेशर पाहून मला धक्का बसला. त्या डॉक्टरांनी मला गोळ्या दिल्या…व्यवस्थित उपचार घेतले आणि मी बरा झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी प्रयोगाला सुद्धा हजर होतो.” असं अशोक सराफ यांनी सांगितलं.