मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबाबत सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरून कलाकार त्यांना श्रद्धांजली देत आहेत. आता सीमा देव यांच्या निधनावर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी होत्या. गेल्या तीन वर्षांपासून त्या अल्झायमर्स या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज सकाळी सातच्या सुमारास यांचा मुलगा अभिनय देव यांच्या घरीच निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल अशोक सराफ यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
ते म्हणाले, “एक देखणी, सुंदर नटी आणि अभिनयाची जाण असलेली एक चांगली शालीन अभिनेत्री गेली ही अत्यंत वाईट गोष्ट झाली असं मी म्हणेन. सीमा देव यांनी अभिनय क्षेत्रात एक विशिष्ट स्थान निर्माण केलं होतं, त्यावर काही वादच नाही. त्यांनी अगदी पहिल्या भूमिकेपासून आपलं स्वतःचं नाव या अभिनय क्षेत्रात कोरून ठेवलं होतं. मी त्यांचं वर्णन फार छान अभिनेत्री म्हणून करेन. तर त्यांनी कित्येक काळ मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्या स्वभावाने अतिशय छान व्यक्ती, मी तर त्यांना अगदी मोठ्या बहिणीसारखं मानायचो.”
पुढे ते म्हणाले, “त्यांची व रमेशजींची जोडी जमली होती. रमेश देव म्हटलं की सीमा यांचं नाव यायचं आणि सीमा देव म्हटलं की रमेश यांचं नाव यायचं. इतकी कामं त्यांनी एकत्र केली होती. गेले काही दिवस त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे भेटायलाही जायला मिळालं नाही, या गोष्टीचं वाईट वाटतंय. एक चांगली अभिनेत्री आपल्यातून निघून गेली, असं निश्चित म्हणेन.”
सीमा देव यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.